आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाक्यांचा पैसा गरीब आणि अनाथांसाठी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दिवाळी म्हटली की फटाके आलेच. मात्र, या फटाक्यांमुळे प्रचंड प्रदूषण होते. पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न होत असताना थोडासा आनंद आणि काहीशा प्रतिष्ठेसाठी आपण पर्यावरणाची अपरिमीत हानी करतोय. ‘नवीन औरंगाबाद शहर उत्सव समिती’ एक वर्षापासून फटाकेरहित दिवाळी साजरी करत आहे. समितीने फटाके न फोडण्याचा संकल्प केला, शिवाय मित्र परिवार, शेजारी, नातेवाइकांनाही ते फटाक्यामुळे होणारे नुकसान समजावून सांगताहेत. महत्त्वाची बाब म्हणजे फटाक्यांचा हा वाचलेला पैसा ते गरजू, अनाथांच्या कल्याणासाठी वापरत आहेत.

दिवाळी हा प्रकाशाचा सण असून या सणात फटाके फोडण्याची प्रथा आहे. घराला रंगरंगोटी, नवीन कपडे व प्रत्येक घरात फटाक्यांची मोठी खरेदी केली जाते. किंबहुना दिवाळीचा अर्धाअधिक खर्च त्यावरच होतो. फटाक्यांचा धूर करून आपण ध्वनी, वायू, भूमी प्रदूषण करतो. हे नुकसान लक्षात घेऊन अनेक संस्था, संघटना याबाबत जनजागृती करण्यासाठी पुढे येत आहेत. गारखेड्यातील ‘नवीन औरंगाबाद शहर उत्सव समिती’ त्यापैकीच एक. तसे पाहता समितीचे काम गणेशोत्सव, शिवजयंती यासारखे सार्वजनिक उत्सव साजरे करण्याचे आहे, पण आता त्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठीही पुढाकार घेतला आहे.

फटाक्यांना दिला फाटा
समितीचे अध्यक्ष बबन डिडोरे पाटील आणि सचिव योगेश मसलगे पाटील यांनी गेल्या वर्षी फटाकेविरहित दिवाळी साजरी करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर समितीच्या सर्व 7 सदस्यांचे एकमत झाले. त्यानंतर समितीशी संबधित 125 ते 150 लोकांनाही फटाके न फोडण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत अर्ध्‍याअधिक जणांनी विनाफटाक्यांची दिवाळी साजरी केली. यंदा समिती या उपक्रमाची पुनरावृत्ती करत असून फटाक्यांची आतषबाजी न करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. इतरांनाही हे आवाहन ते करत आहेत. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी फटाक्याला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचलेला पैसा गरिबांसाठी
फटाक्यांसाठी प्रत्येक घरात एक बजेट असते. घरातील सदस्यांप्रमाणे ते कमी जास्त होते. सरासरी 1 हजार रुपयांचे फटाके गृहित धरले तरी 50-55 सदस्यांमागे मोठी रक्कम जमा होणार आहे. ही रक्कम अनाथार्शम, वृद्धार्शम आणि इतर गरजूंसाठी वापरण्याचे त्यांनी ठरवले आहे. यासाठी समितीचे सदस्य अनाथाश्रमांना भेटी देऊन त्यांना आवश्यक वस्तूंची माहिती गोळा करत आहेत. दिवाळी संपताच ही मदत त्यांना पोहोचवली जाणार आहे.


ही आपली जबाबदारी
आम्ही आमच्या परीने फटाकेरहित दिवाळी तर साजरी करतोच. शिवाय आमच्या ओळखीच्यांना, नातेवाइकांना तसेच सहकार्‍यांना फटाके न फोडण्याचे आवाहन करतोय. आपणही या मोहिमेत सहभागी होऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याला हातभार लावा.
बबन डिडोरे पाटील, अध्यक्ष, नवीन औरंगाबाद शहर उत्सव समिती

पर्यावरण सांभाळा
फटाके फोडणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते, पण यामुळे होणार्‍या प्रदूषणाची कोणीच जबाबदारी घेत नाही. संस्कृतीच्या नावाखाली हे सर्व खपवले जाते. पर्यावरणाचे सवंर्धन करण्यात खरा मोठेपणा आहे.
योगेश मसलगे पाटील, सचिव, नवीन औरंगाबाद शहर उत्सव समिती