आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुच्छतेकडून स्वच्छतेकडे;‘कचरा कचरा जिंदगी’चे बहुमोल पुनर्वसन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कचरा वेचणार्‍यांनी उपजीविकेसाठी जो मार्ग निवडला आहे त्यातून त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य आदी मूलभूत समस्या सुटत नाहीत. शहरातील डॉ. लक्ष्मण माने व अंजली खोडके या दांपत्याने त्या सोडवण्यासाठी गारखेडा परिसरात 2010 मध्ये कचरा वेचक सभेची स्थापना केली. लगेच त्यांनी ‘सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र’ नावाची संस्था उभारली. या माध्यमातूनच ते कचरा वेचणार्‍यांच्या समस्या सोडवत आहेत.

असा घेतला शोध कचरा वेचणार्‍यांचा : डॉ. लक्ष्मण माने व त्यांच्या पत्नी अंजली यांनी कचरा वेचकांना शोधण्यासाठी नकाशा तयार केला.रस्त्यारस्त्यावर फिरून कचरा पॉइंट शोधले. कचरा वेचणार्‍यांसोबत काम केले, त्यांच्याशी मैत्री करून त्यांची नावे व पत्ता नोंद केला. राजीव गांधीनगर, इंदिरानगर, भारतनगर, मुकुंदवाडी, नारेगाव, कबीरनगर, संतोषीमातानगर, मिसारवाडी, रमाईनगर, पिसादेवी, रामनगर, फुलेनगर, छोटा मुरलीधरनगर, आंबेडकरनगर अशा 16 वसाहती समोर आल्या.

प्रशिक्षण, बचत गट आणि आरोग्य शिबिर : व्यक्तिगत स्वच्छतेपासून परिसर स्वच्छ कसा ठेवावा, कचरा हाताळताना कोणती काळजी घ्यावी, गोळा केलेल्या कचर्‍याचे वर्गीकरण कसे करावे, पर्यावरणावर व मानवी शरीरावर त्याचे काय परिणाम होतात, कचर्‍याची साठवणूक आणि वाहतूक याचे नियोजन कसे करावे आदी माहिती देण्यासाठी डॉ. माने यांनी प्रशिक्षण शिबिरेही घेतली. एवढेच नव्हे, तर इंदिरानगरात कचरा जमा करणार्‍या महिलांसाठी बचत गट उभारला. कचरा वेचणार्‍यांच्या मुलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजनही केले जाते.

चार ट्रक कपड्यांचे वाटप : गेल्या दिवाळीला या दांपत्याने शहरातून चार ट्रक जुने कपडे जमा केले व कचरा वेचणार्‍या महिला, पुरुष व मुलांना दिले.

यांची झाली मदत : शासकीय अनुदान नसतानाही कचरा वेचणार्‍यांना आधार देण्याचे काम देणगीदारांच्या भरवशावर चालते. शहरातील प्रज्ञान फाउंडेशनच्या डॉ. विनया भागवत, निर्लेप उद्योगसमूहाचे राम भोगले, ऋचा इंजिनिअर्सचे उमेश दाशरथी, यशर्शी कॉम्पोनंटचे मिलिंद कंक यांची मोलाची मदत होते. तसेच डॉ. मीनल भोगले, विकासराव दुबे, उपेंद्र लिमये, संजय कांबळे, डॉ. द्वारकादास लोहिया, रमेश पांडव, मानसिंग पवार, एम. के. साहिब, किरण सराफ यांचा मोलाचा सल्ला घेत कामाचा प्रारंभ होतो.