आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर एकाकी पडलेल्या इत्याजबींची तब्बल दीड वर्षानंतर प्रशासनाला कळली दैन्यावस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जटवाडा येथील शेख शानूर या शेतकऱ्याने १७ जून २०१६ रोजी आत्महत्या केली आणि इत्याजबी शेख शानूर या त्यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला. अर्धा एकर शेती, सातत्याने कमरेचे दुखणे, उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही. घरात कमावणारे दुसरे कोणीही नसल्यामुळे जगण्याचा मार्ग खडतर बनून गेला. एकुलत्या एक मुलीचं लग्न झाल्यामुळे त्यांना सांभाळणारा दुसरा आधारही उरला नाही. मात्र, तब्बल दीड वर्षानंतर प्रशासन, खुद्द विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, उपायुक्त प्रल्हाद कचरे, तहसीलदार बुधवारी या कुटुंबाच्या घरी गेले आणि इत्याजबी यांना सरकारी योजनांचा दिलासा मिळाला. मराठवाड्यात बुधवारी एकाच दिवशी आठही जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या घरी भेटी दिल्या. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर कुटुबिंयाची काय अवस्था आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला.

 

तहसीलदार सतीश सोनी यांनी इत्याजबी यांचे पालकत्व स्वीकारले. महिलेला काय मदत देता येऊ शकते याची चाचपणी गावकरी तसेच सरपंच, तलाठी, सहायक कृषी अधिकारी यांच्यासमक्ष केली. इत्याजबी यांचा संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म लगेच भरून घेतला. स्वच्छ महाराष्ट्र मिशनअंतर्गत शौचालय बांधून देण्याचे तसेच ज्या रझिया सुलताना महिला गटात त्यांचा सहभाग आहे, त्याद्वारे कुक्कुटपालन वा गरजेनुसार व्यवसाय करण्यासाठी कर्ज देण्याच्या सूचना विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. सरकारी कर्मचारी, पदाधिकारी आणि गावकऱ्यांच्या मदतीने रक्कम गोळा करून महिलेला गॅस घेऊन देण्याची विशिष्ट रक्कम मदत म्हणून देण्याची सूचनाही या वेळी करण्यात आली. भापकर महसूल उपायुक्तांच्या वतीने १०,५००, तर मुश्ताक पटेल यांनी पाच हजार रुपयांची मदत केली.

 

५२ हजार रुपयांचे वीज बिल थकीत : इत्याजबीयांच्या शेतीतील पाच वर्षांचे ५२ हजार रुपयांचे वीज बिल थकीत आहे. शेतात सामाईक विहीर आहे. मात्र, त्याला पाणी नाही. शेतीतून केवळ चार क्विंटल मक्याचे उत्पन्न झाले. बटईने दिलेल्या व्यक्तीना दोन क्विंटल आणि इत्याजबी यांना दोन क्विंटल मिळणार आहे.

 

साहेब, पैसे नसल्यामुळे दवाखान्यातही दाखवले नाही
इत्याजबीशेख शानूर यांना कंबरदुखीचा त्रास आहे. मणक्यात गॅप असल्यामुळे पट्टा लावूनच त्या थोडेफार चालू शकतात. बुधवारी अधिकारी त्यांच्या घरी गेले. त्यांनी तुम्हाला काय हवे आहे, असे विचारल्यानंतर साहेब, पैसे नसल्यामुळे दवाखान्यातही दाखवले नसल्याचे त्या म्हणाल्या.


कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आधार द्यावा यासाठी मराठवाड्यात अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भेटी देण्याचा हा उपक्रम आहे. या माध्यमातून त्यांना योजनांचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...