आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Help Traffic Police Says Bamu Chancellor In Aurangabad

वाहतूक पोलिसांना सुट्यांत सहकार्य करा - डॉ. विजय पांढरीपांडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशाला ख-या अर्थाने पुढे आणायचे असेल तर नागरिकांनी उन्हाळी सुट्यांमध्ये घरी न बसता पोलिसांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी केले. तापडिया नाट्यगृहात आयोजित वाहतूक सुरक्षा पंधरवड्याच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी पोलिस आयुक्त संजयकुमार, उपायुक्त सोमनाथ घार्गे, सुनीता साळुंके-ठाकरे, साहाय्यक पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे, दीपकसिंह गौर, डॉ. संदीप भाजीभाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी सलामे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार बस्ते यांची उपस्थिती होती. डॉ. पांढरीपांडे म्हणाले, 80 टक्के अपघात हे वाहनचालकांच्या चुकांमुळेच होतात. शासकीय कर्मचा-यांना 365 दिवसांपैकी केवळ 200 दिवसच काम असते. उर्वरित वेळ त्यांनी समाजकार्यासाठी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
संजयकुमार म्हणाले, नागरिकांशी संपर्क साधून त्यांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देण्याचा वाहतूक पंधरवड्याचा उद्देश होता. अपघातात भारतानंतर चीन, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. ड्रंकन ड्राइव्हचे अपघातातील प्रमाण 40 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्योगपतींना टोला लगावत ते म्हणाले, आपल्या शहरात एकाच दिवशी दीडशे मर्सिडिझ कार दाखल झाल्या. या कारसह त्यांना कंपनीने महागडे साहित्य सुरक्षेसाठी दिलेले आहे. मात्र, ते कारमधील महागड्या साहित्यांचा उपयोग करताना दिसून येत नाहीत. मग एवढी महागडी कार खरेदी करून ते काय साध्य करतात? शहरात 6 लाख 33 हजार वाहनांची संख्या आहे. त्यात 4 लाखांच्या आसपास दुचाकी आहेत. या वाहनांच्या पार्किंगसाठी साधी जागाही शहरात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
भाऊ, दादा, मामांवर ‘चिखल’ - राजकारण्यांना आणि व्हीआयपी क्रमांक वापरणा-या वाहनधारकांना टोला लगावत आयुक्त म्हणाले, काका, दादा, मामा, भाऊ अशी नावे वाहनांच्या नंबर प्लेटवर आहेत. या वाहनचालकांना त्यांच्या नावाचा मोठा गर्व आहे. मात्र, त्या नंबर प्लेटवर किती धूळ आणि चिखल बसतो याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. अडवल्यावर त्यांचा अहंकार आडवा येतो. यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.