आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी झटणारा प्राध्यापक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पोटार्थी विद्याव्यापारी असणार्‍या या काळात फक्त शिकवण्यापुरते काम न करता आपल्या विद्यार्थ्यांना चरितार्थाच्या संधीही मिळवून देणारा एक प्राध्यापक सरस्वती भुवन महाविद्यालयात आहे. राज्यभरातील नामांकित कंपन्यांशी संपर्क साधून त्याने आपल्या महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करणे आणि नोकरीच्या चांगल्या संधी मुलांना उपलब्ध करून देणे हा त्यांचा उपक्रम. गेल्या 8 वर्षांपासून या प्राध्यापकाची ही धडपड सुरू असून आतापर्यंत तब्बल 1361 विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून दिल्याचे ते अभिमानाने सांगतात. त्यांच्या या कार्याची दखल नुकतीच दिल्लीतील एका संस्थेने घेतली व त्यांना पुरस्कार देऊन सन्मानितही केले आहे.

सध्या जो तो फक्त डॉक्टर आणि इंजिनिअर होण्यासाठी धडपड करताना दिसतो. त्यातही इंजिनिअरिंग क्षेत्रातच कॅम्पस इंटव्ह्यू घेतले जातात. अभियांत्रिकी महाविद्यालयांत कंपन्या स्वत: जाऊन विद्यार्थ्यांना नोकर्‍या देतात, परंतु हा प्रकार बीएस्सी, बीकॉम किंवा बीए या शाखेतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडताना दिसत नाही. येथेच सरस्वती भुवन महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक कायंदे यांनी वेगळा विचार करून या शाखेतील मुलांनाही नोकरीच्या बाजारात ‘डिमांड’ असते हे दाखवून दिले.

पहिल्याच वर्षी यश
सर्वप्रथम 2005 मध्ये डॉ. कायंदे यांनी स.भु. विज्ञान महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले. अनेक विद्यार्थ्यांना घरी जाऊन कॉल लेटर दिले. शहरातील इतर महाविद्यालयांतील विद्यार्थीही यात सहभागी झाले होते. पहिल्याच वर्षी 30 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्याचे ते सांगतात. त्यानंतर हा प्रयोग सातत्याने केला जातोय.

99 कॅम्पस : 1361 रोजगार
सन 2005 मध्ये डॉ. कायंदे औरंगाबादेतील वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा व पैठण एमआयडीसीत फिरले. बर्‍याच कंपन्यांत जाऊन त्यांनी बीएस्सीच्या विद्यार्थ्यांचे महत्त्व पटवून त्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्याची विनंती केली. यात स्थानिक कंपन्यांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. स.भु.च्या कॅम्पसची महती हळूहळू राज्यात, नंतर राज्याबाहेर पसरली. आठ वर्षांत डॉ. कायंदे यांच्या प्रयत्नाने 99 कॅम्पस इंटरव्ह्यू मधून 1361 मुलांना नोकर्‍या मिळाल्या.

दिल्लीने घेतली दखल
डॉ. कायंदे यांच्या कार्याची दखल घेत दिल्लीच्या ग्लोबल हेल्थ अँड एज्युकेशन ग्रोथ सोसायटीने नुकताच दिल्ली येथे बोलावून त्यांचा सत्कार केला. केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयासाठी ही संस्था काम करते. आसामचे राज्यपाल भीष्मनारायण सिंह यांच्या हस्ते कायंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


संस्थेच्या प्रेरणेमुळे हे शक्य झाले
संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर सर, सरचिटणीस अशोक भालेराव व प्राचार्य शिवराज बिराजदार यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे मी हे काम करू शकलो. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई र्शॉफ यांच्या प्रेरणेने मला वेगळे बळ मिळाले. या कामातून मला खूप आनंद मिळतो. पिरियड्स सांभाळून छंद म्हणून हे काम करतो.
प्रा. डॉ. दीपक कायंदे