औरंगाबाद - शिवसेना अडचणीच्या काळात धावून जाते आणि मदत करताना आम्ही जातपात पाहत नाही. फक्त मदत करणे हाच धर्म असतो आणि हेच आमचे कडवे हिंदुत्व आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही माणसे तोडण्याचे नव्हे, जोडण्याचे काम करतो, असा टोलाही त्यांनी लगावला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची २४४ लग्ने लावली.
एकाच मंडपात मुस्लिम, ४२ बौद्ध जोडप्यांचेही लग्न लागले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात एक लाखावर वऱ्हाडी सहभागी होते. सर्वधर्मीय जोडप्यांचे विवाह लावल्याचा धागा पकडून उद्धव यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचे स्पष्टीकरण दिले. उद्धव म्हणाले, आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. विहिरी कोरड्या पडल्या तरी शिवसेनेचा माणुसकीचा झरा आटणार नाही.
शिवसेनेतर्फे याआधी परभणीत ३३३ लग्ने लावण्यात आली. औरंगाबादेत २४४ लग्ने लागली. हा आकडा ५७७ वर पोहोचला असून, लवकरच जालना, बीड उस्मानाबादेत सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. त्यामुळे हा आकडा हजारी पार करेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.