आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई टेकडीवर होणार हेमाडपंती मंदिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देवळाईतील साई टेकडीचा लवकरच कायापालट होणार असून, या जागेवर भक्तांकडून दगडाचे भव्य हेमाडपंती मंदिर उभारले जाणार आहे. गेल्या १५वर्षांपासून शहरवासीयांसाठी अाध्यात्मिक पर्यटन केंद्र बनलेल्या या टेकडीचे अवघे रूपडेच पालटणार आहे. याकामी केवळ औरंगाबादच नव्हे, तर हैदराबाद, गुजरात आणि दिल्ली येथील भक्त मंडळीचा हातभार लागणार आहे.
देवळाई परिसरात प्रवेश केल्यावर पाच किमीवरील निसर्गरम्य डोंगररांगा लागतात. नागमोडी वळण घेत आपण घाट चढू लागलो की साईबाबांचे छोटेसे मंदिर दिसते. गेल्या पंधरा वर्षांपासून हे मंदिर शहरवासीयांचे आकर्षण ठरले आहे. कारण हे ठिकाण आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्रच बनले आहे. हैदराबाद येथे बँकेत काम करणारे कामेश्वर राव या ठिकाणाचा शोध घेत येथे आले. त्यांनी साईबाबांची मूर्ती स्थापन केली. याच जागेवर शेख चाँद यांची घोडी हरवली होती. तेथेच त्यांना साईबाबांनी प्रथम दर्शन दिल्याची अाख्यायिका प्रसिद्ध आहे. तीन वर्षांपूर्वी साई टेकडीवर साईबाबांची बावीस फूट उंच फायबरची मूर्ती बसवली गेली. दर गुरुवारी येथे भंडाराही दिला जातो. आता शहरातील भक्त मंडळींनी एकत्र येऊन ट्रस्ट स्थापन केले आहे. यात कामेश्वर राव हे संस्थापक अध्यक्ष, तर हरिभाऊ हिवाळे अध्यक्ष, राहुल सावंत उपाध्यक्ष, सुनील जाधव कोशाध्यक्ष, तर बाजीराव हिवाळे हे सचिव म्हणून काम पाहत आहेत.

जुलैमध्ये बांधकामास सुरुवात : जुलैमहिन्यात या भव्य मंदिराच्या बांधकामास सुरुवात होणार अाहे. पाच कोटी रुपये खर्च करून अत्यंत आकर्षक असे हेमाडपंती पद्धतीचे मंदिर होईल.तळमजल्यावर ध्यानासाठी भव्य हॉल आणि वर मंदिर राहील. बाजूला अन्नदानासाठी वेगळा हॉल असेल. सर्वात भव्य अन् आकर्षक स्वरूपाचे हे मंदिर असेल, अशी योजना विश्वस्तांनी आखली आहे.

भारत भरातून मदतीचा ओघ : साईटेकडीची माहिती ही केवळ औरंगाबाद पुरती नव्हे, तर संपूर्ण भारतात ती अवघ्या पंधरा वर्षांत पसरली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत साई टेकडी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक पर्यटन केंद्र बनल्यास आश्चर्य वाटायला नको. हैदराबाद येथील कामेश्वर राव हे स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या मुख्यालयात काम करतात. ते ही जागा शोधत आले त्यांनी या मंदिराचा संकल्प केला. वीस वर्षांनंतर या जागेवर सुंदर मंदिर होत आहे. दिल्लीजवळच्या गुडगाव येथील ओमप्रकाश बावेजा हे व्यावसायिक खास विमानाने दर महिन्याला या टेकडीवर साईंच्या दर्शनाला येतात. तेदेखील सढळ हाताने मदत करत आहेत.

शहरातील आकर्षक मंदिर
हे मंदिरडोंगररांगांच्या पायथ्याशी असल्याने हेमाडपंती पद्धतीचे दगडी मंदिर बांधण्याचा संकल्प आहे. आगामी काळात हे एक आध्यात्मिक पर्यटन केंद्रही होईल. जुलैमध्ये गुरुपौर्णिमेला मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल. -सुनील जाधव, कोशाध्यक्ष,साई टेकडी मंदिर