आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यसभा टीव्हीचा जावईशोध, जॉन स्मिथने लावला वेरूळ लेणीचा शोध!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ यांनी १८१९ मध्ये अजिंठा लेण्यांचा शोध लावला. इतिहासात तशा नोंदी आहेत. मात्र, सरकारी मालकीच्या राज्यसभा टीव्हीवर जॉन स्मिथ यांनी अजिंठा नव्हे, तर वेरूळ लेण्या शोधल्याचा जावईशोध लावला आहे. चॅनलवर दिवसभर चालणाऱ्या या क्लिपमध्ये वेरूळ लेण्या जागतिक वारसास्थळ असल्याचा उल्लेखही टाळण्यात आला आहे. २०१७ हे शासनाने व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून जाहीर केले आहे, तर सध्या हेरिटेज वीक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लेण्यांची चुकीची माहिती इतिहास आणि पर्यटनप्रेमींना नाराज करत आहे.
चुकीचे फिलर : काहीदिवसांपासून चॅनलवर दोन कार्यक्रमांमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेत वेरूळ लेण्यांची माहिती दर्शवणारे एक मिनिटाचे फिलर प्रक्षेपित केले जात आहे. ‘इंडियानामा’ नावाच्या या फिलरमध्ये भारताचे वैविध्य दर्शवणारी माहिती दाखवली जाते. यात जॉन स्मिथ यांनी १८१९ मध्ये वेरूळ लेण्यांचा शोध लावल्याचे निवेदक सांगतो. हे सांगतानाच क्लिपमध्ये वेरूळ लेण्यांसह जॉन स्मिथ यांचा पुतळा दाखवला जातो. राज्यसभा टीव्हीच्या सोशल मीडिया अकाउंटवरही ही क्लिप बघायला मिळते. प्रत्यक्षात जॉन स्मिथ यांनी २८ एप्रिल १८१९ मध्ये अजिंठा लेण्यांचा शोध लावला होता. वाघाच्या हल्ल्यामुळे जॉन इतर सहकाऱ्यांपासून वेगळा झाला. भटकत तो जंगलात लपलेल्या या लेण्यांवर पोहोचला. इतिहासात याची नोंद आहे. मात्र, या टीव्ही चॅनलने जॉन स्मिथने वेरूळ लेण्यांचा शोध लावल्याचे सांगून सर्वांनाच चकित केले आहे.

हेरिटेज वीकमध्ये चूक : भारतीयपुरातत्त्व खात्याचा हेरिटेज वीक सध्या सुरू आहे. महाराष्ट्र सरकारनेही पर्यटनाला चालना देण्यासाठी २०१७ हे व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून साजरे करण्याचे जाहीर केले आहे. यात वेरूळ-अजिंठ्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. वेरूळ-अजिंठ्याच्या प्रमोशनसाठी शासनाने वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव घेतला, केंद्र शासनाने सार्क पर्यटन परिषद घेण्याचीही तयारी केली होती. असे असताना मिळणारी वेरूळची चुकीची माहिती पर्यटनप्रेमींना संतप्त करत आहे. टुरिस्ट प्रमोटर्स गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग यांनी याची थेट केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांच्याकडे तक्रार केली आहे. वेरूळ लेण्यांचे अभ्यासक योगेश जोशी यांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे म्हटले आहे. वेरूळ लेण्या कधीच लपलेल्या नव्हत्या. यामुळे जॉन यांनी त्यांचा शोध लावल्याचा प्रश्नच येत नाही. ही माहिती चुकीची असून ती दुरुस्त करावी,असेही ते म्हणाले.

चूक दुरुस्त करा
^वेरूळ सारख्या जागतिक वारसास्थळाची शासनाच्या मालकीच्या माध्यमावर चुकीची माहिती प्रसारित होणे धक्कादायक आहे. ती दुरुस्त करण्यासाठी आम्ही पर्यटनमंत्र्यांना पत्र पाठवले. जसवंतसिंग, अध्यक्ष, टुरिस्ट प्रमोटर्स गिल्ड.
बातम्या आणखी आहेत...