आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नाशकात गोदेची धोक्याची पातळी, गोदाकाठच्या 17 गावांत हायअलर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकमधील या फोटोत एक गंमत टिपण्यात आली आहे. जाहिरातीच्या बोर्डवर एक तरुणी अंघोळ करताना दिसते. तर खाली पुराचे पाणी साचले आहे. - Divya Marathi
नाशिकमधील या फोटोत एक गंमत टिपण्यात आली आहे. जाहिरातीच्या बोर्डवर एक तरुणी अंघोळ करताना दिसते. तर खाली पुराचे पाणी साचले आहे.
वैजापूर - नाशिक जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे गोदावरी नदीपात्रात सुमारे एक लाख ५० हजारांपेक्षा जास्तीने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून धोक्याच्या पातळीने वाहत असून रात्रीतून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

दरम्यान, हे पाणी जायकवाडीच्या दिशेने वेगाने झेपावत आहे. महसूल प्रशासनाने वैजापूर तालुक्यातील गोदाकाठच्या १७ गावांत अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी सुरक्षित स्थळी थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सोमवारी रात्री नाशिक जिल्ह्यात पावसाने धुवाधार बॅटिंग केली. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरण ८७ टक्के भरले होते. त्यामुळे त्यातील पाणी नांदूर मधमेश्वर धरणात सोडण्यात आले होते. नांदूर मधमेश्वर बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून सुरुवातीला ११ हजार क्युसेकने गोदावरी नदीत विसर्ग सुरू केला होता. मात्र पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सायंकाळी ५ वाजता हा विसर्ग एक लाख ५० हजार क्युसेक इतका झाला होता. दरम्यान, गोदावरी नदी दुथडी वाहत असल्याने महसूल प्रशासनही सतर्क झाले आहे. उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांत हाय अलर्ट जारी केला आहे. तहसीलदार सुमन मोरे, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी तत्काळ गोदाकाठच्या गावांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. तालुक्यातील वांजरगाव येथील शिंदे वस्ती, लाखगंगा, बाबतारा या ठिकाणी पाण्याचा वेढा पडू शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

दूरध्वनी नादुरुस्त
तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्या ठिकाणी कार्यरत असलेला ०२४३६ -२२२०६६ हा दूरध्वनी नादुरुस्त आहे. उपविभागीय अधिकारी साताळकर यांनी दुपारी कार्यालयास भेट दिली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ दूरध्वनी कार्यालयात संपर्क साधून तहसील कार्यालयातील दूरध्वनी तत्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
जायकवाडीत ९,३०० क्युसेकने आवक
पैठण । नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या जोरदार पावसाने त्या भागातील धरणातून जायकवाडीच्या वरील धरणातून गोदावरीत २४ तासांपासून पाणी सोडले जात असून सध्या पालखेडमधून २२ हजार ६४४ क्युसेक, कडवातून २१ हजार ४६२ क्युसेक, दारणा ३४ हजार ५५० क्युसेक, गंगापूर ४२ हजार ६४२ क्युसेक वेगाने पाणी नांदूर मधमेश्वरमध्ये दाखल होत असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून सर्व मिळून १ लाख २५ हजार ९११ क्युसेक वेगाने पाणी गोदावरीत सोडले जात आहे. असे असले तरी जायकवाडी प्रत्यक्षात ९ हजार ३०० क्युसेक वेगाने पाणी येत असून बुधवारी रात्री साडेबारा वाजता जायकवाडीचा साठा मृतमधून जिवंत साठ्यात आला. नगर जिल्हातील मुळा धरणाचे पाणी गोदावरीत न सोडता धरणावरील उजव्यातून ७२७ क्युसेकने पाणी वळवण्यात येत आहे.
गंगापुरातही अतिदक्षतेचा इशारा
गंगापूर | नांदूर मध्यमेश्वर पिकअप वेअरमधून आज एक लाख क्युसेकने सोडण्यात आलेले पाणी वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथे उद्या दुपारपर्यंत पोहोचणे अपेक्षित असून २००६ नंतर पहिल्यांदाच एवढ्या जास्त वेगाने पाणी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तालुक्यातील गोदाकाठच्या नऊ गावांमधील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून यामध्ये नेवरगाव, हैबतपूर, अगरकानडगाव, बगडी, जामगाव, कायगाव, अमळनेर, लखमापूर, ममदापूर यांचा समावेश आहे. या गावांंमधील शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना पुराचा धोका अधिक असल्याची सूचना प्रशासनाने दिली आहे.याशिवाय तालुक्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील शिवना व खाम नदीकाठच्या मालुंजा बु., सिरजगाव, ढोरेगाव, सोलेगाव, बाबरगाव, मालुंजा खु. व शेंदुरवादा, धामोरी बु., शिवपूर येथील नागरिकांनादेखील दक्षतेचा इशारा दिला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, नाशिक शहरात घुसलेले पुराचे पाणी.... अनेक पुल-रस्ते गेले पाण्याखाली.... शाळा-कॉलेजना सुटी....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...