आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाय प्रोफाइल भामटा जिन्सी पोलिसांच्या स्वाधीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बंगळुरू येथील वैद्यकीय महाविद्यालयात एम. एस. ऑर्थोपेडिक्सच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून आकाशवाणी परिसरातील डॉक्टर कृष्णकुमार वेदप्रकाश शर्मा यांना 75 लाखांना गंडा घालणार्‍या दीपक चॅटर्जी नावाच्या भामट्याला दिल्ली पोलिसांनी सोमवारी (14 ऑक्टोबर) जिन्सी पोलिसांच्या स्वाधीन केले.

त्याला 15 ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. चॅटर्जी आणि प्रतीक अग्रवाल या भामट्यांविरुद्ध 15 मार्च 2013 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आकाशवाणी परिसरातील मंजीतनगरात राहणारे डॉ. कृष्णकुमार शर्मा यांचा मुलगा कशिशने भोपाळ येथील पीपल्स कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. 15 मे 2012 रोजी कशिशला भेटण्यासाठी शर्मा भोपाळला गेले होते.

तेथील एका इंग्रजी दैनिकात एमबीबीएस / बीडीएस / एमडी / एमएस आणि एमडीएसचे शिक्षण घेण्यासाठी देशातील विविध महाविद्यालयांत प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यामधील मोबाइल क्रमांकावर आणि ई- मेलवर शर्मा यांनी संपर्क साधला होता. तेव्हा त्यांचे प्रतीक अग्रवालशी बोलणे झाले होते. त्याने मँगलोर येथील ए. जे. शेट्टी मेडिकल कॉलेजमध्ये एम. एस. ऑर्थोपेडिकसाठी प्रवेश प्रकिया सुरू असल्याचे सांगत 70 लाख रुपये डोनेशन आणि कॉलेज फीस म्हणून पाच लाख रुपयांचा डीडी लागेल, असेही सांगितले होते. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक रवींद्र बागुल हे करीत आहेत.

दरम्यान, डॉ. शर्मा यांनी दिलेल्या रकमेचाही शोध घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असा अडकला जाळ्यात
फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे हे 28 ऑगस्ट रोजी चॅटर्जीच्या शोधासाठी दिल्लीला गेले होते. चॅटर्जीच्या मागावर असताना राजस्थान, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आणि बिहार येथील अनेकांना त्याने गंडा घातल्याचे उघड झाले. त्यातच बिहारमधील एका डॉक्टरला त्याने 9 लाख रुपयांना गंडा घातला असून त्याच्याशी समझोता करण्यासाठी चॅटर्जी उच्च न्यायालयात येणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत चॅटर्जीला पकडले होते.