आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाका मार्केट व्यापाऱ्यांना हायकोर्टाचा जामीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद:  जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केट आगप्रकरणी अटकेत असलेल्या फटाका व्यापारी असोसिएशनच्या चौघा पदाधिकाऱ्यांना खंडपीठाचे न्या. एन. डब्ल्यू. सांबरे यांनी गुरुवारी नियमित जामीन मंजूर केला. 
 
फटाका मार्केटला २९ आॅक्टोबर रोजी लागलेल्या आगीत १४२ दुकानांसह चारचाकी, दुचाकी वाहने जळून खाक झाली होती. या प्रकरणात फटाका असोसिएशनचे पदाधिकारी विलास पूनमचंद खंडेलवाल (रा. बंजारा कॉलनी), गणेश देविदास चौधरी (रा. औरंगपुरा), माणिकचंद आसाराम महतोले (रा. पीरबाजार) श्रीकांत रामराव देशपांडे (रा. एन-३, सिडको) या चौघांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.
 
या व्यापाऱ्यांनी ३० डिसेंबर रोजी नियमित जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला असता तो फेटाळण्यात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अ‍ॅड. रामेश्वर तोतला यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. 
 
युक्तिवाद धरला ग्राह्य : अॅड.तोतला यांनी युक्तिवाद करताना नमूद केले की, १८० व्यापाऱ्यांनी परवान्यासाठी महानगरपालिकेला लाख ८० हजार रुपये देऊन वैयक्तिक परवाने घेतले. २७ आॅक्टोबर २०१६ रोजी मनपाने मैदानावरील फटाका मार्केटची तपासणी केली. त्यात त्यांना कोणत्याही त्रुटी आढळल्या नाहीत.
 
२९ रोजी आग लागल्यानंतर व्यापाऱ्यांनी मनपाच्या अग्निशमन विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली, मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. उलट सात दिवसांनी मुख्य अग्निशमन अधिकारी मोहंमद जफर खान यांच्या तक्रारीवरून व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पुन्हा भादंविचे ४३६ हे कलम वाढवले.
 
घटनेनंतर तहसीलदारांनीही पंचनामा केला. त्यात व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत करण्याचा उल्लेख केला, असे नमूद केले. खंडपीठाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून चौघा व्यापाऱ्यांचा जामीन मंजूर केला. अॅड. तोतला यांना अॅड. बद्रिनाथ काटे, अॅड. स्रहेल तोतला, अॅड. राहुल तोतला आणि अॅड. खंडेलवाल यांनी सहकार्य केले. अर्जदार श्रीकांत देशपांडेतर्फे अॅड. नीलेश घाणेकर यांनी बाजू मांडली. 
बातम्या आणखी आहेत...