आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात इशारा अतिवृष्टीचा अन् पाऊस सुरू झाला रिमझिम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हवामान खात्याने मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्ह्यात शनिवारी काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. औरंगाबादमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी शहरात पावसाला सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत १२.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेत करण्यात आली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत शनिवारी रिमझिम पाऊस झाला. वैजापूर, सोयगाव तालुक्यात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊस सुरू झाला. काही वेळाच्या खंडानंतर रात्री आठच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. औरंगाबाद शहरात सुरुवातीचा अर्धा तास पावसाची रिमझिम सुरू होती. संध्याकाळी साडेपाचपर्यंत दोन मिमी पावसाची नोंद झाली, तर साडेआठ वाजेपर्यंत तीन तासांत १२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांनी सांगितले. मोठ्या खंडानंतर पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण असले तरी खरीपाच्या पिकास या पावसाचा फारसा फायदा होणार नाही, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र काही अंशी सुटणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. वैजापूर तालुक्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. सोयगाव, गंगापूर, पैठण तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू हाेता. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत २२० मिमी पाऊस झाला आहे. पैठण तालुक्यात सर्वात कमी १०७ मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, मराठवाड्यात काही ठिकाणी १९ ते २३ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी पुरापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

शहरात अनेक भागांत वीज गायब : संध्याकाळी पाऊस आल्यानंतर अनेक भागांत वीज गायब होती. सिडको एन-२, मुकुंदवाडी, सारा कासलीवाल पार्क, प्रकाशनगर, रामनगर, विठ्ठलनगर, रेल्वेस्टेशन परिसर, सिडको एन-८, एन-७, टीव्ही सेंटर, ज्योतीनगर आदी भागांत वीज गुल झाली होती.
बातम्या आणखी आहेत...