आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समुद्रफळातून चार तज्ज्ञांनी शोधले संधिवातावरील औषध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समुद्रकिनारी आढळणाऱ्या समुद्रफळ (हिज्जल प्लांट) या झाडाच्या फळातील औषधी गुणधर्मांचे संशोधन करून औरंगाबाद येथील डॉ. संजय तोष्णीवाल यांच्यासह राज्यातील चार तज्ज्ञांनी संधिवातावर गुणकारी औषध शोधले आहे. सूज वेदनाशामकाचे काम करणाऱ्या या आयुर्वेदिक औषधाला भारत सरकारने पेटंट बहाल केले आहे.
अॅलोपॅथीमध्ये संधिवातावर पेनकिलर, स्टेरॉइड्सचे उपाय असले तरी त्यांचे दुष्परिणाम आहेत. त्यामुळे या आजारावरील औषध शोधावे, असे डॉ. तोष्णीवाल यांना वाटत होते. आयुर्वेदात गुणकारी म्हणून उल्लेख असलेल्या समुद्रफळासंदर्भात विशेष संशोधन झालेले नव्हते. कोकण परिसरातील जमाती या झाडाच्या पाल्याचा वेदनाशामक म्हणून उपयोग करतात. या अनुषंगाने डॉ. तोष्णीवाल, शिरपूर येथील पटेल औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील, प्रा. कल्पेश रामदास पाटील सातारा येथील प्राचार्य डॉ. रामचंद्र बाबूराव जाधव यांनी २००३ मध्ये संशोधन सुरू केले.

समुद्रफळामध्ये बारटोजेनिक अॅसिड नावाचे औषधी गुणधर्म आढळले. हे अॅसिड संधिवातावर सूजनाशक वेदनानाशक म्हणून गुणकारी असल्याचे या टीमने शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केले. तसेच विविध प्रकारच्या औषधींच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले समुद्रफळाचे इतर घटकांचे प्रमाण बनविण्याची पद्धती सादर केली. या संशोधनाला भारत सरकारने २००८ पासून पुढे वीस वर्षांसाठी पेटंट बहाल केले आहे.

रुग्णांना मिळेल दिलासा
यासंशोधनामुळे संधिवातावर सुरक्षित औषधांची निर्मिती होईल. संधिवात इतर वेदनांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना या संशोधनातून दिलासा मिळेल, असा दावा संशोधकांनी केला. औषधनिर्माणशास्त्रामध्ये मराठवाड्यातील संशोधकाला यापूर्वी केवळ एकदाच पेटंट मिळाले होते. आता डॉ. संजय शिवनारायण तोष्णीवाल यांच्यामुळे यात भर पडली आहे. डॉ. तोष्णीवाल यांनी २००९ मध्ये केंद्र शासनाने घेतलेल्या भारतीय पेटेंट प्रतिनिधी परीक्षेमध्ये देशभरातून प्रथम क्रमांक मिळवला होता. तसेच इतरही अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत.
छायाचित्र: डॉ. संजय तोष्णीवाल
बातम्या आणखी आहेत...