आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिमायत बागेतील चांदणी चबुतरा होऊ शकतो पर्यटन स्थळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: ऐतिहासिक पार्श्वभूमी..वनराईच्या मध्यभागी असलेली सुंदर टेकडी..समोरच दिसणारा बीबीका मकबरा, प्रदूषणमुक्त परिसर आणि शुद्ध ऑक्सिजन देणारी हवा.. हे वर्णन आहे हिमायत बागेतील चांदणी चबुतर्‍याचे. मानसिक समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा हा परिसर एक सुंदर नैसर्गिक पर्यटन स्थळ होऊ शकतो. या भागाचा त्या दृष्टीने विकास व्हावा असे शहरातील ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि नहर-ए-अंबरीचे अभ्यासक रमजान शेख यांना वाटते. हिमायत बागेत जागोजागी जुन्या ऐतिहासिक खुणा पाहायला मिळतात. दिल्ली गेटच्या बाजूने बागेत गेल्यावर एक चौरस्ता येतो. त्या रस्त्यावरून पुढे सरळ मकबर्‍याच्या दिशेने गेल्यावर उजव्या हाताला एक छोटीशी टेकडी दिसते. तिला पूर्वी चांदणी चबुतरा असे म्हटले जायचे. या टेकडीवर मध्ययुगीन काळातील काही मजार ( हजरत शहा जलालशाह, हजरत शहा अली शाह, हजरत चांदनी बेगम आणि हजरत मीर जमालउद्दीन ऊर्फ मीरा साब) आहेत. शुद्ध हवा समोर असलेली वनराई आणि तेथे दर्शन घेऊन घटकाभर बसले तरी सारा थकवा निघून जातो. दिवसभराची ऊर्जा या ठिकाणी मिळते म्हणूनच नित्यनेमाने येथे येणारे लोक आहेत. या टेकडीची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगताना शहरातील ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि नहर-ए-अंबरीचे गाढे अभ्यासक शेख रमजान यांनी सागितले की, साधारण 16 व्या शतकात (1610 ते 1629 पर्यंत या ठिकाणी मलिक अंबर यांचे वास्तव्य होते.) आणि पुढे निजाम राजवटीत संपूर्ण हिमायत बागेच्या जागेवर भले मोठे तळे निर्माण करण्यात आले. या विशाल या तलावाचे नाव ‘तालाब-ए-कला’ असे होते. त्याचे क्षेत्र दिल्ली गेटपासून ते मकबर्‍यापर्यंत होते. तलावात एखाद्या बेटाप्रमाणे ही छोटीशी टेकडी होती. निजाम आपल्या बेगम आणि मुलांसह या तलावात बोटिंगचा आनंद घेत असे. चांदण्यात खुलत होते तलावाचे सौंदर्य याच परिसरात निजामाचा महाल होता. सुंदर चांदणे पडले की या तलावात खास बोटिंगचा कार्यक्रम आखला जायचा. टेकडीवरून तर हे दृश्य खूपच सुंदर दिसायचे. पुढे काही कारणास्तव या तलावाचे क्षेत्रफळ कमी करण्यात आले. माती टाकून तेथे भराव टाकण्यात आला. पण आजही ती टेकडी मात्र तशीच आहे. अजूनही या टेकडीवरून बागेचा परिसर आणि मकबर्‍याचे दृश्य तितकेच मनोहारी दिसते. म्हणूनच या टेकडीचे आणखी सुशोभीकरण करून तेथे एक सुंदर पर्यटन क्षेत्र तयार केले जाऊ शकते.
हवी फक्त इच्छाशक्ती
मजारचे दर्शन घेऊन टेकडीवरून संपूर्ण परिसर पाहता येतो. सूर्योदय व सूर्यास्ताचे दृश्यही पाहता येऊ शकते. टेकडी व आसपासच्या परिसरात विविध वृक्ष व वनराई आहे; पण त्यात आणखी भर घालून तिचा विकास करता येऊ शकतो.