आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindustan Petroleum Company,Latest News In Divya Marathi

पानेवाडी डेपोत ‘एचपी’चे पाच पेट्रोल पंप कोरडे, पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनमाडजवळील पानेवाडी डेपोत हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे पेट्रोल पुरवठा करणा-या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्याचा परिणाम शहर परिसरातील पेट्रोप पंपांवर दिसत आहे. सुमारे पाच पंपांवर मंगळवारी रात्रीपासून साठा संपल्याचे बोर्ड झळकत होते. डिलर्सही गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलचा साठा मिळत नसल्याची तक्रार करत आहेत. पानेवाडी येथील डेपोची दुरुस्ती सुरू असल्यामुळे ‘एचपीसीएल’च्या पंपधारकांना लोणी आणि वाशी येथील डेपोतून पुरवठा करणे सुरू होते. मात्र, दोन दिवसांपासून लोणी येथेही अडचणी निर्माण झाल्यामुळे शहरातील पंपधारकांना 350 किलोमीटर दूर असलेल्या वाशी येथून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होत होता. मात्र, ज्या पंपधारकांकडे स्वत:चे टँकर नाही अशांना मात्र साठा मिळाला नसल्याचे डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले. शिवाय पेट्रोल मिळवण्यासाठी टँकरला दोन दिवसांपासून प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही ते म्हणाले. नेहमीच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी मराठवाड्यासाठी स्वतंत्र डेपो द्यावा. औरंगाबादेतील प्रस्तावित डेपोचे काम गतीने सुरू करावे, अशी मागणी डिलर्स असोसिएशनकडून होत आहे.

बंद पेट्रोल पंप
हिंद सुपर सर्व्हिसेस, क्रांती चौक, एटीसी सर्व्हिसेस, ए. एस. क्लब, वाळूज रोड, एचपी पंप बजाजनगर आणि शरणापूर फाटा. बुधवारी सायंकाळपर्यंत वाळूजमधील एचपीच्या पंपावरील साठा संपत आल्याची माहिती मिळाली आहे.

तीन दिवसांपासून साठा नाही
गेल्या तीन दिवसांपासून पंपावर साठा नसल्यामुळे वाहनधारक नाराज होत आहेत. पुरवठ्याबाबत कंपनीच्या अधिका-यांना विचारणा केली. मात्र, कोणतेही उत्तर मिळत नाही. आनंद संचेती, संचालक, एटीसी सर्व्हिसेस.
पुरवठा सुरळीत
बुधवारी लोणी आणि पानेवाडीतील 80 टक्के काम पूर्ण झाले. सर्व पंपांना रात्रीपर्यंत साठा पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोणी आणि पानेवाडी डेपोतून हा पुरवठा करण्यात येईल. प्रेम सिंग, विक्री अधिकारी, एचपीसीएल औरंगाबाद.