आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३ हजार ऐतिहासिक पुस्तके मृत्युशय्येवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरबी व पर्शियन भाषेतील ६०० वर्षे जुनी ३ हजार पुस्तके, त्या त्या काळातील राजकीय-सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा आज धूळ खात पडला आहे. ऐतिहासिक पाणचक्कीतील ग्रंथालयाची ही सद्य:स्थिती. १७ व्या शतकात स्थापन झालेले हे आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रंथालय होते. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी वक्फ बोर्डाकडे पैसा नाही. दुसरीकडे याच वाचनालयात अभिलेख कार्यालय थाटण्यात आल्याने पुस्तके अडगळीत टाकण्यात आली आहेत. त्यामुळे पुस्तकांना व पर्यायाने ग्रंथालयालाच वाळवी लागली आहे.

पाणचक्कीची उभारणी झाल्यानंतर हजरत बाबा शहा मुसाफिर यांनी १७ व्या शतकात या ग्रंथालयाची सुरुवात केली. याला खानखाँ (गुरुकुल) असेही संबोधले जायचे. सर्व जाती-धर्माचे लोक येथे येऊन शिक्षण घेत असत. त्या काळात हे ग्रंथालय आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रंथालय होते. हजरत बाबा यांनी हैदराबाद, ओडिशा, बंगाल अशा अनेक ठिकाणी भ्रमण केले. नंतर ते औरंगाबादेत स्थायिक झाले. त्यांनी येथे २४ खोल्यांचा खानखाँ सुरू केला. या ठिकाणी इराक, इराण, कतार, अफगाणिस्तान, इजिप्त अशा अनेक देशांमधून अरबी आणि पर्शियन भाषेची अनेक पुस्तके आणली. एक लाख पुस्तकांचा खजिना येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला.
दुर्मिळ पुस्तकांचा खजिना
या ग्रंथालयात इस्लाम तत्त्वज्ञानावरील पुस्तकांशिवाय राजकीय, आर्थिक व सामाजिक अशी विविध विषयांची पुस्तके आहेत. विशेषत: हजरत बाबा शहा यांची १५ ते २० हस्तलिखिते व ग्रंथ या ठिकाणी आहेत. मुगल सम्राट औरंगजेब यांनी ३५० वर्षांपूर्वी लिहिलेल्या कुरआनची प्रत येथे आहे. कुरअानच्या ३० अध्यायांतील ितसरा अध्याय स्वत: औरंगजेब यांनी लिहिला होता. या अध्यायाला सोनेरी अक्षरांची झालर देण्यात आली. तसेच इस्लाम तत्त्वज्ञानावरील ५०० पानांचा ग्रंथ, एक हजार पानांचा अरबी-उर्दू पर्शियन शब्दकोश, मौलाना मीर गुलाम अली यांची हस्तलिखिते आहेत.
यांनी उघडली ग्रंथालयाची दारे
कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या या ग्रंथालयाची दारे तत्कालीन वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल रऊफ शेख यांनी खुली केली. २००८ पूर्वी हे ग्रंथालय ४० ते ५० वर्षे बंद होते. ग्रंथालय हे एका समाजाचे नसून ते सर्वांचे आहे. सर्वांना येथे पुस्तके वाचता आली पािहजेत. त्या त्या काळातील अभ्यास करता आला पािहजे. या हेतूने त्यांनी हे ग्रंथालय सर्वांसाठी खुले केले. दुपारी ३ ते ५ या वेळेत हे ग्रंथालय सर्वांना उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, पुन्हा या ग्रंथालयाला नजर लागली आणि हा ऐतिहासिक खजिना बंद कपाटात धूळ खात पडून आहे.
उरली केवळ तीन हजार पुस्तके
या ग्रंथालायात पूर्वी एक लाख पुस्तके होती. हैदराबादचा संस्थापक मीर कमरोद्दीन अली खान बहादूरने बादशहा औरंगजेबाच्या काळानंतर या ठिकाणी आक्रमण करून येथील अनेक पुस्तके नेली. त्यातून कशीबशी तीन हजार पुस्तके रािहली. अनेक वर्षांपासून बंद असलेले हे ग्रंथालय सुरू झाले खरे, पण वक्फ बोर्डाच्या विद्यमान अधिकाऱ्यांनी त्याचीही वाट लावली. ग्रंथालयातील अभिलेख कार्यालयात ३ ते ५ या वेळेत देशी-विदेशी पर्यटकांना वाचनालयाची दारे खुली करण्यात आली होती. या काळात लंडन विद्यापीठातील सायमन डफ, पाकिस्तानातील जागतिक कीर्तीचे रचनाकार इंतजार हुसेन यांच्यासह बेल्जियम, न्यूझीलंड, फ्रान्स, हॉलंड, इस्रायल, जपान, इराक, इराण आदी देशांतील इतिहासकारांनी अभ्यास केला. मात्र, हे ग्रंथालय आता विद्यमान वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी ताब्यात घेतले असून पुस्तकांची कपाटे कोपऱ्यात लावून अभिलेख कार्यालय थाटले आहे. त्यामुळे पुस्तके वाचणे वा बघणे सोडाच, ती इतर फायलींच्या गठ्ठ्यात पडली आहेत. त्यांच्यावर धूळ आणि वाळवी चढली असून ही ऐतिहासिक पुस्तके खराब होत चालली आहेत.
बहुमूल्य खजिन्यासाठी पैसा नाही
वक्फ बोर्डाकडे हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी निधी नसल्याचे कारण पुढे केले जाते आहे. मात्र, अधिकाऱ्यांमध्ये अनास्था असल्याने ग्रंथालय संवर्धन केले जात नाही.
हा ऐतिहासिक ठेवा धूळ खात पडला आहे...
होय, याचे मला खूप दु:ख आहे. मी नुकताच आलो आहे. आता याकडे विशेष लक्ष देणार.
दुर्मिळ ग्रंथांचे जतन करण्यासाठी काय पावले उचलणार?
या ग्रंथालयाला राष्ट्रीय दर्जा द्यावा व जतन करण्यासाठी शासनाने फंड द्यावा, अशी मागणी करणार आहोत.
तुम्ही तुमच्या स्तरावर ग्रंथालयासाठी काय करणार?
आमच्या विभागाला साधारण १३ लाखांचा निधी मिळतो आणि खर्च मात्र तब्बल ३० लाखांपर्यंत आहे. असे असले तरी आता आमची परिस्थिती चांगली आहे.
सय्यद एजाज हुसेन,
मुख्य कार्यकारी अधिकारी, वक्फ बोर्ड

पुस्तकांसाठी चांगली जागा हवी
^शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले हे ग्रंथालय केवळ मुस्लिमांचे नसून सर्वांचे आहे. या दुर्मिळ ग्रंथांचे जतन व्हावे, यासाठी चांगली जागा हवी. त्यासाठी ग्रंथांना राष्ट्रीय ठेवा म्हणून घोिषत केले जावे.
शेख जलील पाशा सरवर, ग्रंथपाल