आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमद निजामशाहने बांधलेल्‍या ‘हश्त-बेहश्त महाला’ला अखेरची घरघर; पडझड वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर शहराचा संस्थापक अहमद निजामशाहने सन 1506 मध्ये बांधलेला फैजबक्ष महाल (हश्त-बेहश्त महाल) अखेरच्या घटका मोजत आहे. तातडीने डागडुजी झाली नाही, तर या ऐतिहासिक वास्तूचे आयुष्य फार दिवस असणार नाही. सध्या भिस्तबाग म्हणून ओळखल्या जाणा- या परिसरात निजामशाहीत देखणे उद्यान होते. उद्यानाच्या मध्यभागी तलाव आणि त्यात बांधलेला गुलाबी रंगाचा अष्टकोनी दुमजली महाल, त्याशेजारी असलेला राजेशाही हमामखाना (स्नानगृह), या वास्तूपासून काही अंतरावर हवेसाठी मनोरा असलेला महिलांच्या स्नानासाठी बांधलेला बादगीर, तसेच लक्कड महाल यामुळे हा परिसर वैशिष्ठ्यपूर्ण बनला होता. उद्यानाचे आठ भाग होते. त्यात देश-विदेशांतून आणलेली फळे व फुलांची झाडे लावण्यात आली होती. गाणारे पक्षीही या वनात होते. रत्न, माणकांची सुशोभीत केलेल्या या महालात जाण्यासाठी होड्या असत. जलविहारासाठी पिंपळगाव व शेंडीच्या तलावातून खापरी नळाने पाणी आणले गेले होते.
महाल बांधल्यानंतर दोनच वर्षांनी अहमदशहाचा मृत्यू झाल्याने या उद्यानाचा खरा उपभोग पुढच्या बादशहांनाच घेता आला. दुसरा बादशहा बु- हाण निजामशहाने या महालाचा व उद्यानाचा विस्तार केला. मुर्तूजा निजामशहाचे हे अतिशय आवडते ठिकाण होते. पुढे अकबराचा मुलगा मुराद नगरवर स्वारी करण्यासाठी आला, तेव्हा त्याचेही वास्तव्य याच परिसरात होते. 508 वर्षांच्या या महालाच्या बांधकामात सागवानी तुळया व चुन्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. अनेक ठिकाणच्या तुळया चोरीस गेल्या आहेत. त्यामुळे छताचे बांधकाम खिळखिळे झाले आहे. पावसाचे पाणी झिरपून उरलेले लाकूडही खराब झाले आहे. हमामखान्याजवळ असलेल्या मुख्य कमानीच्या आतील छताच्या आतील काही भाग नुकताच कोसळला. त्यामुळे संपूर्ण वास्तूलाच धोका निर्माण झाला आहे.

‘पुरातत्व’ची जबाबदारी
नगर शहरातील न्यामतखानी दरवाजा, दो बोटी चिरा व अन्य काही वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाने संरक्षित केल्या आहेत. वास्तविक हश्त-बेहश्त महालाची देखभाल पुरातत्वने प्राधान्याने करावी, अशी मागणी अमेरिकेतील विद्यापीठात डॉक्टरेट मिळालेले पुष्कर सोहनी यांनी काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाकडे केली होती. या मागणीची त्याच वेळी दखल घेतली असती, तर या महालाचे आयुष्य आणखी काही वर्षे नक्की वाढले असते.
मदतीची तयारी
नगर येथील व्हर्सटाइल ग्रूपच्या सदस्यांनी या वर्षभरात शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तूंना भेट दिली. त्यांची दुरवस्था पाहून या वास्तूंचे जतन व देखभाल करण्यासाठी आवश्यक मदत करण्याची तयारीही त्यांनी दाखवली. भिंतीवर, तसेच छतावर उगवलेली झाडेझुडपे वेळीच काढली, तर वास्तूला हानी पोहचणे थांबते. अशी झुडपे काढण्यासाठी रासायनिक प्रक्रिया प्रभावी ठरते, अशी माहिती व्हर्सटाईल ग्रूपचे डॉ. महेश मुळे यांनी दिली.