आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत बारावर्षीय चालक मुलाने वृद्ध महिलेला चिरडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मामाची कार चालवायला गेलेल्या बारा वर्षांच्या मुलाने सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हडकोतील स्वामी विवेकानंदनगरात रमाबाई गोपाळराव महाजन (80) यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुलाचा मामा सोमवारी मुंबईहून कार (एमएच-04-एसी-1934) घेऊन आला होता. घरात कारची किल्ली ठेवल्याचे पाहून या मुलाने चक्कर मारण्यासाठी कार सुरू केली. घरापासून काही अंतरावर सुसाट वेगाने जाणार्‍या कारने घराबाहेर बसलेल्या रमाबाई महाजन यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला जबर मार लागला व त्यांच्या डोक्यात लोखंडी गेटचा गज शिरला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतरही या मुलाला काहीही समजत नव्हते. तो ब्रेकऐवजी एक्सलरेटरवरच पाय देऊन बसला होता.

अपघात झाल्याचे पाहून काही नागरिक कारच्या दिशेने धावून आले. त्यांनी कारमधून या बालकाला खाली खेचले. यानंतर मुलाच्या मामाने धाव घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिडको पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहोचले. रमाबाई यांना घाटीत दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रात्री 10 च्या सुमारास महाजन कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 16 एप्रिल रोजी टी.व्ही. सेंटर चौकात देवदर्शन घेऊन परतणार्‍या काका-पुतणीलाही कार चालवणार्‍या अल्पवयीन चालकाने चिरडले होते. त्यानंतर पाच महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल टकले करीत आहे.