आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होलिक्रॉस कॉन्व्हेंटमध्ये स्काउट गाइड शिबिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोला भारत स्काउट्स आणि गाइड्स जिल्हा संस्थेतर्फे स्काउट गाइडचा 26 वा जिल्हा मेळावा खिरपुरी बुद्रूक (बाळापूर) येथे 4 ते 7 फेब्रुवारीदरम्यान भाऊसाहेब तिरुख विद्यालयात आयोजित केला आहे. मेळाव्याचे उद्घाटन 5 फेब्रुवारीला आमदार बळीराम सिरस्कार यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई राहतील. शिक्षक आमदार वसंतराव खोटरे, जि.प.चे उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, सीईओ अरुण उन्हाळे, डॉ. नवीन तिरुख उपस्थित राहतील. 7 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाइडचे अध्यक्ष बाबासाहेब धाबेकर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होईल. शिक्षण उपसंचालक रामपवार, पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श उपस्थित राहतील. पहाटे 5.30 वाजता उठून प्रार्थना, सकाळच्या कामांची धावपळ त्यानंतर रामधून उपक्रमनंतर लगबगीने आपला तंबू उभारून तो सर्वाधिक चांगला सजवणे यांसारख्या उपक्रमांमध्ये होलिक्रॉस कॉन्व्हेंटमधील विद्यार्थी रमले आहेत. शाळेत स्काउट गाइडच्या शिबिरास 1 फेब्रुवारीस प्रारंभ झाला.
या स्काउट गाइडच्या शिबिरासाठी 31 जानेवारीला दुपारी 3 नंतर सर्व विद्यार्थ्यांनी हजेरी लावून नोंदणी केली. त्यानंतर आपले साहित्य घेऊन तंबूंची उभारणी केली. 1 फेब्रुवारीला सकाळी 5.30 ला सर्व विद्यार्थी उठून कामात गुंतले. त्यानंतर 6 ला रामधून उपक्रम झाला. त्यानंतर लॉर्ड बेडन पॉवेल कसरतीचे आयोजन झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तंबूची सजावट केली. मान्यवरांनी तंबूंची पाहणी केली. शिबिराचे उद्घाटन सिस्टर फिलॉमिना, शिक्षणतज्ज्ञ जेनेफर, मुख्याध्यापिका पुष्पा थॉमस यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर ध्वजवंदन झाले. शिबिरात कब बुलबुलच्या 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत धमाल केली. अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी सादर केले.
या शिबिरात एकूण 43 गाइड व 78 स्काउट सहभागी झाले आहेत. सायंकाळी शेकोटी पेटवून शेकोटी गीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी विनोदी किस्से, चुटकुले, कथाकथन, नृत्य, अभिनय, मिमिक्री आदींचे सादरीकरण केले. उद्या 2 फेब्रुवारीला शिबिराच्या पर्यवेक्षिका दिव्या कुल्लू, मुख्याध्यापिका पुष्पा थॉमस यांच्या उपस्थितीत समारोप होईल. शिबिरासाठी प्रमुख संगीता धनवटे, विशाखा देशमुख, सीमा दुर्गे, प्रवीण धनोकार, राजेश्वर पाठक, शैलेश भाटिया, मंगला ताजने आदी पुढाकार घेत आहेत.