आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलंडच्या दांपत्याने दत्तक घेतली जिल्हा परिषद शाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - पाच वर्षांपूर्वी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेले जो इमेन व त्यांची पत्नी जोझ या हॉलंडच्या दांपत्याला ठाणा गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा चांगलाच लळा लागला आहे. विद्यार्थ्यांची बिकट आर्थिक स्थिती पाहून या दांपत्याने ही शाळा दत्तक घेतली आहे. या दांपत्याने गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी १०२ विद्यार्थ्यांसाठी डेस्क, गणवेशासह विविध भेटवस्तूही दिल्या आहेत. वर्षभर व्हॉट्सअॅप, ई-मेलद्वारे ते शिक्षक तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून विचारपूस करतात.
फदार्पूरजवळील ठाणा येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे. परिसरातील १०२ विद्यार्थी या प्राथमिक शाळेत शिकतात.
अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेणारे हे विद्यार्थी आणि विवंचना विसरून मुक्तहस्ते ज्ञानदान करणा-या शिक्षकांनी जो इमेन (७०) आणि त्यांची पत्नी जोझ इमेन (६५) या दांपत्याला आपलेसे केले आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात ते न चुकता शाळेला भेट देतात. विद्यार्थ्यांना काय हवे-नको हे गाइडच्या माध्यमातून जाणून घेत मदत देतात. आतापर्यंत त्यांनी डेस्क, पाट्या, गणवेश, खेळाचे साहित्य आदी ६५ हजार रुपयांच्या वस्तू दिल्या आहेत. कधी त्यांची मुलगी जोलिता इमेन (४२) यांनाही ते सोबत घेऊन येतात. या वर्षीही त्यांनी जानेवारीत शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांना पेन, वह्या दिल्या. शाळेसमोरील बागेत घसरगुंडी असावी, असे विद्यार्थ्यांनी सांगताच पुढील वर्षी ही इच्छाही पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
विद्यार्थ्यांचा लळा लागला
पाच वर्षांपूर्वी हे दांपत्य पहिल्यांदा शाळेत आले. खडतर परिस्थितीत शिक्षण घेणारे विद्यार्थी पाहून त्यांनी मदतीचा हात पुढे केला. आता त्यांना विद्यार्थ्यांचा लळा लागला असून ते दरवर्षी शाळेत येऊन स्वत: भेटवस्तूंचे वाटप करतात.
- शांताराम वाघ, शिक्षक, ठाणा शाळा

सुखी आयुष्यासाठी मदत
जो इमेन आणि जोझ इमेन हे दांपत्य अजिंठा लेणी पाहायला आले होते. लेणी पाहताना त्यांनी परिसरात भेटी दिल्या. ते ठाणा गावातील शाळेत येताच विदेशी पाहुणे पाहायला विद्यार्थी गोळा झाले. या विद्यार्थ्यांचे कपडे, शैक्षणिक साहित्य पाहून त्यांना वाईट वाटले. या मुलांच्या आयुष्यात सुखाचे क्षण यावेत, यासाठी त्यांनी मदत दिली. आता तर शाळाच दत्तक घेतली.
अयुब पठाण, गाइड

ती पाहणार जग...
चौथीतील अलिया महंमद शेख हिला दृष्टिदोष आहे. जालन्याच्या गणपती नेत्रालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. हे दांपत्य उपचारांचा खर्च करते. तिला दरवर्षी तपासणीलाही नेतात.
पाच वर्षांपूर्वी लेणी पाहायला आलो होतो. गाइड अयुब पठाण यांच्यामुळे शाळेची माहिती मिळाली.
गरीब विद्यार्थ्यांची चिकाटी पाहून काही वस्तू भेट म्हणून दिल्या. यातून समाधान मिळते. - जो इमेन, हॉलंडचे नागरिक
पुढे वाचा