आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन : होमिओपॅथी व अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचे वेगवेगळे बंद व मोर्चे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सरकारच्या बीआरएमएस (बॅचलर इन रुरल हेल्थ मेडिसिन अँड सर्जरी) संकल्पनेच्या निषेधार्थ मराठवाड्यातील डॉक्टरांनी आंदोलन केले. यामुळे वैद्यकीय सेवा काही प्रमाणात कोलमडली होती.
जालना - होमिओपॅथी डॉक्टरांसाठी राज्य सरकारने तयार केलेल्या रिफ्रेशर कोर्सची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, याच मागणीसाठी डॉक्टरांनी तीन दिवस बंद पुकारला आहे. सकाळी 11 वाजता शहरातील गांधी चमन येथून या मोर्चाला सुरुवात झाली. यात जिल्हाभरातील जवळपास 500 होमिओपॅथी डॉक्टर सहभागी झाले होते. या वेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. नेमाने, डॉ. व्ही. वाय. कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
बीड - कारवाईच्या बडग्याखाली दबलेल्या स्त्रीरोग तज्ज्ञांसह आयुर्वेदिक, होमिओपॅथी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी बीडमध्ये वेगवेगळी आंदोलने केली. सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांवरील कारवाईत प्रामाणिक डॉक्टर भरडले जात असल्याने या कारवाईच्या निषेधार्थ दोन दिवस बंद पाळण्याचा इशारा स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिला. डॉ. सुनील राऊतमारे यांच्या नेतृत्वाखालील स्त्रीरोग तज्ज्ञांनी जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. होमिओपॅथी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी डॉ. प्रमोद पवार यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढला.
परभणी - क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्टच्या विरोधात शहरातील निमा संघटना, होमियोपॅथिक संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलने बंद पुकारला. बंदमध्ये डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून तालुका पातळीवर तहसीलदार, तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत धेमगुंडे, सचिव डॉ. कुलदीप शिरपूरकर, कोशाध्यक्ष डॉ. अमोल दीक्षित आदींच्या नेतृत्वाखाली हा बंद पाळण्यात आला.
नांदेड - होमिओपॅथिक प्रक्टिशनर्स असोसिएशन आणि निमा संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वतंत्र मोर्चे काढण्यात आले. होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर अ‍ॅलोपॅथीची औषधी देण्यास मेडिकल स्टोअर्स चालकांनी नकार दिला आहे. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. मुंबई होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर अ‍ॅक्ट 1959 मध्ये सन 1998 मध्ये करण्यात आलेली दुरुस्ती रद्द करावी, होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषधी न देण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा आदी मागण्यांचे निवेदन दोन्ही संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
लातूर - बीएएमएस पदवीधर डॉक्टरांच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) वतीने मंगळवारी बंद पाळण्यात आला. त्यानंतर मोर्चा काढून जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता गांधी चौकातून हा मोर्चा निघाला. उत्तर प्रदेशात निमा संघटनेच्या डॉक्टरांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मोर्चेकरांनी निषेध केला. या वेळी डॉ. प्रमोद हतांगळे, डॉ. विनोद कोराळे, डॉ. दयानंद मोटेगावकर, डॉ. प्रवीण कुलकर्णी डॉ. शांतीलाल शर्मा आदी उपस्थित होते.