आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होमिओपॅथी उपचाराने बरा के ला ब्रेन ट्यूमर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ब्रेन ट्यूमर झाला म्हणजे आयुष्य संपले, असा अनेकांचा समज आहे. मात्र, त्याला छेद देत होमिओपॅथी औषधांच्या वापराने ट्यूमर बरा होऊ शकतो हे शहरातील डॉ. प्रवीण बीडकर यांनी सिद्ध करून दाखवले. नुकत्याच फ्रान्समधील पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथीक परिषदेत त्यांनी याविषयी शोधनिबंधाचे वाचनही केले. होमिओपॅथीच्या उपचाराने रुग्णाला पूर्ण आराम मिळाल्याच्या उदाहरणाने जगभरात त्यांच्या निबंधाची दखल घेण्यात आली. एवढेच नाही तर गर्भपिशवी आणि स्तनात होणा-या गाठींसाठी ही थेरपी आशेचा किरण घेऊन आली आहे.

असे घडले विमल इंगळेंसोबत : मिलिंद हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका विमल इंगळे यांच्या डाव्या डोळ्यावर करण्यात आलेल्या विविध चाचण्यांमध्ये त्यांना ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान झाले. मुंबईच्या के. ई. एम. रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढण्यात आला. यानंतर आठ महिन्यांमध्ये पुन्हा त्रास सुरू झाल्याने एमआरआय करण्यात आला. यात ट्यूमरमध्ये 32 3.1 एमएम आकार झाल्याचे आढळले, ही वाढ धोकादायक होती. दरम्यान मुबईतील डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली.
मात्र, रुग्णाच्या जिवाला धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंगळे यांना शुगर, बीपी, हार्टव्हॉल्व्हचा आजार (अ‍ॅवरटिक स्नेनॉसिस) आणि पल्मनरी हायपरटेंशन असे विविध आजार असल्याने त्यांची परिस्थिती नाजूक होती. अशावेळी त्यांचा मुलगा डॉ. अभिजित इंगळे यांना होमिओपॅथीमध्ये धूसर आशा दिसू लागली, त्यामुळे डॉ. प्रवीण बीडकर यांच्याशी चर्चा केली. त्या पूर्ण ब-या होतील अशी खात्री नसली तरी संपूर्ण विश्वासाने डॉ. बीडकर यांनी त्यांच्या उपचारांची सुरुवात केली. आठच महिन्यांमध्ये ट्यूमरच्या आकारात लक्षणीय घट झाली. पुढच्या सहा महिन्यांपर्यंतच जग पाहू शकणार नाही असे सांगितलेल्या इंगळेंना आज पाच वर्षे झाली. त्या उत्तमपणे आयुष्य जगत आहेत. याशिवाय डॉ. विलास मगरकर यांच्याकडे केलेल्या टू डी तपासणीतही आश्चर्यकारक परिणाम एका महिन्यात दिसून आले. त्यांना ट्यूूमरचा कुठलाही त्रास नसल्याचे डॉ. अभिजित यांनी स्पष्ट केले.
शास्त्रज्ञांचे वेधले लक्ष
या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जगभरातून दीड हजार शास्त्रज्ञ आले होते. 240 शोधनिबंधांपैकी डॉ. बीडकर यांचा शोधनिबंध लक्षणीय ठरला. जर्मनीच्या लोबोलाइफ कंपनी आणि यू. के. येथील होमिओ व्हायटॅलिटी या कंपनीच्या शास्त्रज्ञांनी डॉ. बीडकर यांच्या प्रयोगाची शास्त्रीय माहिती घेऊन आगामी काळात त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यांच्या यशाबद्दल डीकेएमएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांतीलाल देसरडा आणि उपप्राचार्या डॉ. कांचन देसरडा यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दोन प्रकारचे ट्यूमर
ब्रेनाइन ट्यूमर आणि मालीग्नंट ट्यूमर असे ट्यूमरचे दोन प्रकार आहेत. यामध्ये ब्रेनाइन ट्यूमर शरीरात एका ठिकाणी होतो आणि त्याच ठिकाणी वाढतो, तर मालीग्नंट ट्यूमर एका अवयवाला होतो, रक्ताद्वारे इतर अवयवांपर्यंत पोहोचतो, सर्व अवयवांना नष्ट करतो.
गाठींवर होमिओपॅथी उत्तम उपचार
- गर्भपिशवी आणि स्तनांमध्ये गाठी झाल्यास होमिओपॅथी उपचारांतून आजवर अनेक रुग्णांच्या गाठी पूर्णपणे नष्ट केल्या आहेत. गाठ जाणवताच रुग्ण घाबरून जातात आणि अवयव किंवा गाठ शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यास तयार होतात. डॉ. प्रवीण बीडकर, एमडी होमिओपॅथी, मेडिसीन
असे उपचार शक्य आहेत
- ट्यूमरचा अर्थ गाठ असा आहे. गाठ कुठल्या प्रकारची आहे, यावरून ती शस्त्रक्रिया करून काढावी किंवा औषधांनी हे ठरते. आयुर्वेदिक, अ‍ॅलोपॅथिक, होमिओपॅथी अशा विविध प्रकारांत अशा प्रकारचे उपचार शक्य आहेत. मात्र, ते रुग्णाची परिस्थिती, उपचारांची अचूक वेळ यावर निश्चित होते. होमिओपॅथीने गाठ घालवता येते. तशीच इतर पॅथींच्या उपचारातूनही ती घालवता येते.
डॉ. देवदत्त देशमुख, न्यूरोसर्जन