आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडी धरणातून चार वर्षांत प्रथमच शेतीला पाणी शक्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - चार वर्षांनंतर प्रथमच जायकवाडी धरणातील पाणीसाठा 16 टक्क्यांवर आला आहे. वरील धरणांतून येणार्‍या ओव्हरफ्लोच्या पाण्याचा ओघ सुरू असून ऑगस्टअखेर साठा 40 टक्क्यांवर पोहोचेल अशी शक्यता आहे. त्यामुळे यंदा शेतीला पाणी मिळणे शक्य असल्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे.

जोपर्यंत धरणाचा पाणीसाठा 33 टक्क्यांपेक्षा अधिक होत नाही तोपर्यंत मराठवाड्यातील शेतीला पाणी देणे शक्य नसल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. मात्र, वरील धरणातून पाणी आवर्तन बंद केले असले तरी ओव्हरफ्लोच्या पाण्याची आवक सुरूच राहणार असल्याने यंदा साठा 40 टक्क्यांवर पोहोचून पिण्याशिवाय शेतीलादेखील मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व अहमदनगर जिल्ह्यांतील 1 लाख 83 हजार 322 हेक्टर क्षेत्र जायकवाडीच्या पाण्यावर सिंचित होते. मात्र, गतवर्षी जायकवाडीचा पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने धरणाचे पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे उन्हाळ्यात मराठवाड्यातील शेतीला पाणीपुरवठा झाला नाही. यंदा तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडेल व जायकवाडी जलाशयातून शेतीला पाणी मिळेल, असे चित्र आहे. वरील धरणातून ओव्हरफ्लोचा ओघ 12 ऑगस्ट नंतर पुन्हा सुरू झाला आहे, असे कार्यकारी अभियंता एस. पी. भर्गोदेव यांनी सांगितले.

धरणाचा पाणीसाठा 33 टक्के झाल्यानंतर शेतीला पाणी द्यावे, असा नियम आहे. सध्या पाणीवाटपाचा प्रधान्यक्रम बदलल्याने धरणाचा साठा 40 ते 50 टक्के झाल्याशिवाय शेतीला पाणी देणे शक्य होणार नाही. असे असले तरी धरणातील साठा 33 टक्क्यांवर पोहोचण्याच्या शक्यतेने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

साडेतीन कोटींची पाणीपट्टी पाण्यात
गतवर्षी शेतीला पाणी देणे शक्य झाले नसल्याने सुमारे साडेतीन कोटींच्या पाणीपट्टीवर पाटबंधारे विभागाला पाणी सोडावे लागले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत सरासरी 1 कोटी 30 लाख 400 हेक्टर क्षेत्र प्रत्यक्षात सिंचनाखाली आले.

2008-10 मध्ये सर्व प्रकारे एकूण 2 लाख 70 हजार हेक्टर क्षेत्र प्रत्यक्षात भिजले. त्यामुळे शेतीचे उत्पादन अंदाजे 205.20 कोटींपर्यंत वाढले, तर 2009 मध्ये सिंचन पाणीपट्टीद्वारे 3.67 कोटी व इतर रु. 51.15 कोटी पाणीपट्टी वसूल झाली. शासनाला याच वर्षी 54.82 कोटींचा महसूल मिळाला. त्याचप्रमाणे 205.20 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाली.

या वर्षी 40 टक्क्यांपर्यंतची शक्यता
वरील धरणांमधून जायकवाडीसाठी हक्काचे पाणी सोडण्यात येत नाही. मात्र, पावसाळा सुरू असल्याने वरील धरणांतून ओव्हरफ्लोचे पाणी आले तरी 40 टक्के साठा होण्याचा अंदाज आहे. त्या साठय़ावर उन्हाळ्याच्या पाणी कपातीप्रमाणे पाणी वापरले तरच पिण्यासाठी व औद्योगिक वसाहतींना पाणी पुरेल. त्यानंतरच शेतीच्या पाण्याचा विचार होऊ शकतो.