आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार कार्ड जोडणीसाठी गॅस ग्राहकांची फरपट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-वर्षभरात नऊऐवजी 12 सिलिंडर देण्याचे मान्य करत ‘आधार’चे बँक खात्याशी संलग्नीकरण करण्याच्या योजनेला केंद्राने तूर्त स्थगिती दिली. ही बातमी शहरात सायंकाळी धडकली. दिवसभर मात्र गॅस ग्राहकांची बरीच फरपट झाली. ‘आधार’ जोडणीचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याचे समजून विविध ठिकाणच्या गॅस एजन्सी तसेच बँकांमध्ये ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. याचा फायदा घेत काही एजन्सीने प्रत्येक संलग्नीकरणामागे दहा रुपये उकळल्याची तक्रार ग्राहकांनी केली.
नोव्हेंबर महिन्यापासून गॅसचे अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यावर जमा करण्याची योजना केंद्राने सुरू केली. शहरात ‘आधार’ संलग्नीकरणासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ‘आधार’ संलग्नीकरणासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी प्रसिद्ध केले. याची दखल घेऊन गॅस ग्राहकांनी शहरातील विविध गॅस एजन्सी आणि बँकांमध्ये आधार कार्डची सत्यप्रत देण्यासाठी गर्दी केली होती. ग्राहकांच्या आधार कार्डच्या सत्यप्रती घेण्यासाठी एपीआय कॉर्नर येथील व्यंकटेश गॅस एजन्सीने स्टॉल उभारला होता. अनेक महिलांना चिमुरड्यांसह एजन्सीवर रांगेत थांबावे लागले. कामगार, नोकरदारांनीही बँकेत गर्दी केली होती.
दोन तास ओंकार एजन्सी बंद
गॅस ग्राहकांची गर्दी वाढत असल्याने ओंकार गॅस एजन्सीने 12.30 ते अडीच लंच टाइमच्या नावाखाली एजन्सी बंद ठेवली होती. दोन तास ताटकळल्यानंतर नागरिकांनीच पुढाकार घेऊन एजन्सीचे शटर उघडले. एजन्सीमध्ये कर्मचारी काम करत असल्याचे पाहून सर्वच ग्राहकांचा पारा चढला होता. शिवाय येथे प्रत्येक ग्राहकाकडून 10 रुपये घेतले जात असल्याने काही ग्राहकांनी कर्मचार्‍यांना याचा जाब विचारला; पण त्यांना योग्य उत्तर मिळाले नाही.
एजन्सीकडून अनेकांची लूट
ओंकार गॅस एजन्सीने ‘आधार’ संलग्नीकरणासाठी प्रत्येक ग्राहकाकडून 10 रुपये वसूल करून लूट सुरू केली आहे. आधार कार्ड घेण्यासाठी स्टॉल लावण्याऐवजी दुपारी एजन्सी बंद करून ग्राहकांची गैरसोय केली. एजन्सी संचालकानेही मोबाइल स्वीकारला नाही. संतोष नवतुरे, ग्राहक, ओंकार गॅस एजन्सी.