आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Horticulture Scheme Proposal In Dustbin At Khultabad Taluka

खुलताबाद तालुक्यात फळबाग योजनेचे प्रस्ताव धूळ खात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद - महाराष्‍ट्र शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांना फळबाग पुनरुज्जीवनासाठी हेक्टरी 30 हजार रुपये अनुदान देण्याचे घोषित केले. त्यानुसार खुलताबाद तालुक्यातील अनेक शेतक-यांनी मोठ्या अपेक्षेने आपल्या फळबागा पुनरुज्जीवनासाठीचे प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयात दोन महिन्यांपासून जमा केले आहेत. मात्र, हे प्रस्ताव शासनाच्या अटीनुसार नसल्याने धूळ खात असून यापैकी एकही प्रस्ताव मंजूर होण्याची चिन्हे नसल्याने कृषी विभागाकडून शेतक-यांमध्ये नाराजीचा सूर आहे.


राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यातील फळबाग शेतक-यांसाठी फळबाग पुनरुज्जीवन योजनेद्वारे हेक्टरी 30 हजार रुपये देण्याचे घोषित केले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात शेतक-याने फळबागेस सेंद्रिय मल्चिंग तसेच बोर्ड पेस्ट, शेणखत, रासायनिक खत, कीड नियंत्रण केल्यास शेतक-यास 15 हजार रुपये देण्यात येणार असल्याची शासनाने घोषणा केली. यासाठी फळबाग शेतक-यांना आपले प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल करायचे होते. तसेच यासाठी जिल्हा भरातील कृषी विभागाच्या अधिका-यांची जिल्हा कृषी अधीक्षक अधिका-यांनी 20 मार्च 2013 रोजी बैठक बोलावली होती. बैठकीदरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक अधिका-यांनी सर्व तालुका कृषी अधिका-यांना दोन वर्षांपर्यंत फळबाग असलेल्या शेतक-यांच्या पुनरुज्जीवन प्रस्तावास मंजुरी देण्याच्या तोंडी सूचना केल्या होत्या. या बैठकीस खुलताबाद तालुका कृषी अधिका-यांचीही उपस्थिती होती.


यामुळे होणार प्रस्ताव रद्द : कृषी अधीक्षकांनी दिलेल्या सूचनांमुळे तालुका कृषी विभाग पुनरुज्जीवन प्रस्ताव घेण्याच्या कामाला लागला. यामुळे तालुक्यातील अनेक फळबाग शेतक-यांनी तालुका कृषी विभागात आपले पुनरुज्जीवन प्रस्ताव दाखल केले. परंतु ही योजना केवळ दुष्काळग्रस्त भागांसाठीच असल्याचे लक्षात आल्यावर तालुका कृषी विभाग चांगलाच अडचणीत सापडला. कारण या तालुक्यांसाठी प्रत्येक फळबागेचा कालावधी बदलण्यात आलेला आहे. यामध्ये आंबा - 20 वर्षे, चिकू - 25 वर्षे, डाळिंब - 6 वर्षे, मोसंबी - 10 वर्षे, पेरू - 15 वर्षे, लिंबू - 8 वर्षे व संत्री - 10 वर्षे असलेल्या फळबागांना पुनरुज्जीवनासाठी अनुदान देण्यात येणार होते. मात्र, दिलेल्या वर्षाच्या कालावधीमध्ये एकही शेतकरी बसत नसल्याने कुठल्याही शेतक-याचा प्रस्ताव मंजूर होणार नसल्याचे दिसत आहे.


शेतक-यांमध्ये नाराजीचे वातावरण :
खुलताबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात विविध फळबागांची लागवड करण्यात आलेली होती. मात्र, यापैकी पाण्याअभावी जवळपास 80 टक्के फळबागा जळून गेल्याने राहिलेल्या फळबागा वाचवण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत होते. अशातच शासनाने फळबाग पुनरुज्जीवनासाठी योजना राबवल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत खुलताबाद तालुक्याचा समावेश नसल्याने आपले प्रस्ताव नामंजूर होऊन आपणास या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार असल्याचे दिसत असल्याने शेतक-यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


का पडले प्रस्ताव धूळ खात?
खुलताबाद तालुक्याची पैसेवारी जास्त निघाल्याने दुष्काळग्रस्तांसाठीच्या योजना तालुक्याला देण्यात आल्या नसल्याचे वेगळे परिपत्रक शासनाकडून आल्याने फळबाग शेतक-यांचे आलेले शेकडो प्रस्ताव कृषी विभागात धूळ खात आहेत.


सहकार्याची भूमिका
खुलताबाद तालुक्यातील फळबाग असलेल्या शेतक-यांना पुनरुज्जीवन योजनेचा इतर तालुक्यांप्रमाणे फायदा मिळावा व हे प्रस्ताव परत करण्यापेक्षा मंजूर करण्यात यावेत, ही आमची भूमिका आहे. डी. एम. जाधव, मंडळ अधिकारी