आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - सात महिन्यांपासून वेतन मिळाले नाही म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वाहनचालक सत्यवान विश्वनाथ पैठणपगारे (28) यांनी रविवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेकडे पाठ फिरवत आरोग्य विभागाचा एकही अधिकारी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेला नाही.
तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेत कंत्राटी वाहनचालक म्हणून पैठणपगारे कार्यरत होते. कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांनी विवाहदेखील केला नव्हता. सात महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. वडील मोलमजुरी करतात. लहान भाऊ शाळा शिकतो. सत्यवानने आत्महत्या केल्यापासून त्याच्या आईची मानसिकता ढासळली आहे. सत्यवानच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार न केल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खरे कारण उशिरा उजेडात आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. या संदर्भात आरोग्य अधिकारी बी. टी. जमादार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘बैठकीत आहे, एक तासानंतर संपर्क साधतो’ आणि भ्रमणध्वनी बंद करून ठेवला.
माझा गोट्या आला : सत्यवानला घरात लाडाने गोट्या म्हणत. आजही त्याची आई कानावर वाहनाचा आवाज पडला की ‘माझा गोट्या आला..’ असे म्हणत रस्त्याकडे पळत सुटते.
कर्ता मुलगा गेला..
माझा कर्ता मुलगा केवळ प्रशासनाच्या चुकीमुळे गेला. उतारवयात आम्हाला सहारा कोण देणार? त्याला वेळेवर पगार न दिल्यामुळे आमची उपासमार झाली. विश्वनाथ पैठणपगारे, मृताचे वडील
या प्रकरणाची माहिती मला नाही. आरोग्य अधिकार्यांना कळले असते तर स्पष्ट झाले असते. याबाबत आरोग्य अधिकार्यांशी चर्चा करून चौकशी केली जाईल. दीपक चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
आमच्याकडे कुणीही वेतनाच्या निराशेने आत्महत्या केल्याची तक्रार केली नाही. त्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून चौकशीनंतर चित्र स्पष्ट होईल. खुशाल शिंदे, पोलिस निरीक्षक, कन्नड ठाणे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.