आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही नंबर एकवरच राहणार, कुणीही अक्कल शिकवू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आमचा पक्ष राज्य विधानसभेत एक नंबर ठरला आहे. मात्र आम्ही नंबर एक म्हणालो की मित्रपक्षाच्या पोटात दुखते. आम्ही नंबर एकवर असताना दोन नंबर कसे काय म्हणणार? आम्ही यापुढेही एक नंबरच राहणार असून त्याबाबत आम्हाला कोणी अक्कल शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली. तनवाणी यांना आमदार करण्यासाठीच शहराध्यक्षपदी बसवल्याचे सांगताना त्यांच्यासह इतरांनाही शहरात आमदार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याचे दानवे म्हणाले.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल दानवे यांचा भाजपच्या वतीने संत तुकाराम नाट्यगृहात सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, आमदार नारायण कुचे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, बापू घडामोडे, उपमहापौर प्रमोद राठोड, भागवत कराड, एकनाथ जाधव, श्रीकांत जोशी, बसवराज मंगरुळे, दिलीप थोरात, विवेक देशपांडे, संजय केणेकर उपस्थित होते. दुष्काळ असल्यामुळे सत्कारासाठी वह्या आणण्याचे आवाहन शहराध्यक्षांनी केले होते. तरीही काही जणांनीच वह्या आणल्या. इतरांनी पुष्पगुच्छ देऊनच स्वागत केले.

या वेळी तनवाणी म्हणाले की, सरकारच्या योजना वाॅर्डाध्यक्षाच्या माध्यमातून राबवण्याची गरज आहे. वाॅर्डात वाॅर्ड अध्यक्ष मोठा करण्याची गरज आहे. आगामी काळात होणाऱ्या सातारा-देवळाईच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. शहरातल्या तीन मतदारसंघांत भाजपची ताकद वाढली आहे. प्रदेशाध्यक्षांनी थोडेसे लक्ष घातले तर आगामी काळात तीनही आमदार भाजपचेच राहतील, असे आ. सावे म्हणाले. भाजप पदाधिकाऱ्यांनी काँट्रॅक्टरशिपच्या नादी लागण्याऐवजी महिला मंडळ तसेच पक्षाची इतर कामे करावीत, असा सल्ला त्यांनी दिला.

दुसऱ्यांदा अध्यक्ष आणि तीन तास उशीर
दानवे यांची पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वर्षभरापूर्वी तापडिया नाट्यगृहात सत्कार ठेवला होता. त्या वेळीही दानवे तीन तास उशिरा आले होते. दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतरही पाच वाजता ठेवलेल्या सत्काराच्या कार्यक्रमाला ते आठ वाजता आले. क्रांती चौकात वा. वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तनवाणी यांनी भव्य शक्तिप्रदर्शनदेखील केले. दानवे उशिरा आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते निघून गेले.
दानवे म्हणाले की, मुंबईतल्या गल्ल्या माहीत नाहीत असे आमचे मित्रपक्ष आम्हाला म्हणतात. मात्र मुंबईच्या गल्लीत तर रिक्षावालादेखील नेऊन सोडतो. मात्र गल्ली माहीत असणाऱ्यांनी हिंमत असेल तर गाव फिरून दाखवावे, असे आव्हान दानवे यांनी दिले. आमच्यासारखे महाराष्ट्रातल्या खेड्याखेड्यात फिरलात तर तुमच्याकडे साल घालीन. मी जंगलात फिरणारा पठ्ठ्या आहे, असे सांगत आम्हालाही ताकद वाढवण्याचा अधिकार असल्याचे दानवे म्हणाले. तनवाणींबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजप हा समुद्र असून यामध्ये आलेल्या नद्यांचे पाणी वेगळे काढता येत नाही. त्यामुळे सर्व पदाधिकारी तुमच्या पाठीशी आहेत.