आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक राम गेला म्हणून काय झालं... मी तीन रामची आई बनले !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माझा राम नेहमी म्हणायचा, आई मी आभाळाएवढा मोठा होईन. तुझं नाव रोशन करीन. माझ्यामुळे तुझे सत्कार होतील. त्याचं म्हणणं एका अर्थानं खरं झालंय. राम मला सोडून गेला नाही. उलट मी तीन रामची आई झालेय... असे धीरोदात्त शब्द त्या माउलीच्या तोंडातून बाहेर पडत होते अन्् सभागृहात हुंदके फुटत होते. १५ जानेवारी रोजी देऊळगावमही येथील राम सुधाकर मगर या ब्रेनडेड झालेल्या २४ वर्षीय तरुणाचे अवयव दान करण्याचा निर्णय त्याची आई मंदाबाई मगर यांच्या पुढाकाराने सिग्मा हॉस्पिटलमध्ये अमलात आला. जग सोडून जाताना राम तीन जणांना जीवदान देऊन गेला. यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मंदाबाईंचा बुधवारी हॉटेल रामा येथे मिडटाऊन लायन्स मेडिकल सर्व्हिस ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला. त्या वेळी रामविषयीच्या अनेक गोष्टी सांगताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. त्या म्हणाल्या, राम आणि राधा ही माझी जुळी मुलं. दोघं महिन्यांचे होते तेव्हा त्यांचे वडील आम्हाला सोडून गेले होते. दोन वर्षांपूर्वी माझा भाचा रवींद्रसाठी दोन किडन्या मिळवताना आमचे संपूर्ण कुटुंब तगमगले होते. राम ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर माझा भाऊ सिद्धार्थने लगेच अवयवदानाचा विचार बोलून दाखवला. ताई, आपला राम चार जणांत जिवंत राहील. आपण चार कुटुंबांचा आधार बनू शकतो, असे तो म्हणताच मी कागदावर सही केली. त्वचेसह सर्वकाही दान करण्याची आमची तयारी होती.
राम कॅरम खेळण्यात तरबेज होता. तो तबला-पेटी उत्तम वाजवायचा. अभंग, भजन ऐकताना सर्व तल्लीन होऊन जायचे. "तुझं स्वप्न पूर्ण केलंय, मी घरी येतोय, काळजी करू नको,' हे अकोला येथे नोकरी मिळाल्याचे कळल्यावर त्याचे शेवटचे शब्द होते. १२ वी नंतर तो बुलडाण्याच्या गोंडे महाविद्यालयात शिकला. महिने खामगाव तालुक्यातील माटरगावात शिक्षक म्हणून नोकरीही केली. एमपीएससीत जिल्ह्यांत पहिला आला होता. त्या दिवशी अकोल्याला नोकरीसाठी मुलाखतीला जाताना पांडुरंगाला, हनुमानाला डोकं टेकवलं आणि गाईला पोळी घालून गेला.