आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमहापौरांच्या आधी तनवाणींचा सत्कार, स्मिता घोगरेंनी कार्यक्रमस्थळ सोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जागतिक महिलादिनी पालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सत्कार करताना उपमहापौर स्मिता घोगरे यांचा प्रोटोकाॅल पाळला नाही, त्यामुळे त्या अपमानित झाल्या आणि दुसऱ्याच मिनिटाला कार्यक्रम स्थळ सोडले. हिरकणी कक्षाच्या उद््घाटन सोहळ्यात सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला. 

पालिका मुख्यालयात हिरकणी कक्ष उभारण्यात आला असून महिला दिनाच्या औचित्यावर त्याचे उद््घाटन करण्यात आले. आयुक्त ओमप्रकाश बकोरिया या कार्यक्रमाला हजर नव्हते. महापौर भगवान घडामोडेही मुंबईला असल्याने महिला बालकल्याण समितीच्या सभापती अर्चना नीळकंठ यांनी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांना पाचारण केले होते. विशेष म्हणजे चतुर्थश्रेणी महिला कर्मचाऱ्याच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. 

यावेळी समितीच्या वतीने उपस्थितांचा सत्कार झाला. त्यावेळी महापौरांच्या अनुपस्थितीत घोगरे यांनाच महापौर म्हणून वागणूक मिळणे अपेक्षित होते. मात्र आयोजकांना प्रोटोकॉलचा विसर पडला आणि घोगरे यांच्याआधी तनवाणी यांचा सत्कार करण्यात आला. प्रोटोकॉल पाळला नाही, असे दिसताच कोणतेही भाष्य करता घोगरे यांनी कार्यक्रमस्थळ सोडले. ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता ‘आयोजकांनी पदाचा प्रोटोकॉल पाळायला हवा होता’ एवढेच त्या म्हणाल्या. 

दिव्य मराठी भाष्य: दीपक पटवे 
‘सत्ताशरणागती’ म्हणजेकाय, याचे उत्तम उदाहरण म्हणून या प्रकाराकडे पाहायला हवे. आपल्याला पद देण्याची सत्ता कोणाकडे आहे एवढेच लक्षात ठेवून त्यांची खुशमस्करी करणे हा राजकीय स्थायीभाव असू शकतो. त्यामुळे सभापतींना तनवाणी अधिक महत्त्वाचे वाटणे समजू शकते.पण म्हणून लोकप्रतिनिधींचा, विशेषत: शहराच्या दृष्टीने मानाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींचा सन्मान राखताना कुचराई अपेक्षित नाही. मग पक्ष आणि व्यक्ती कोणीही असो. खरे तर ही जबाबदारी प्रशासनाची आहे आणि प्रशासनाकडून ती पाळली गेलीच पाहिजे. 
बातम्या आणखी आहेत...