आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काम 12 लाखांचे, उचलले 77 लाख; वसतिगृहाच्या नूतनीकरणाच्या कामात घोटाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पदमपुर्‍यातील संत तुकाराम आणि जुन्या मिलिंद वसतिगृहाच्या नूतनीकरणाच्या कामात 60 लाखांचा घोटाळा झाला आहे. ‘डीबी स्टार’ने केलेल्या तपासात हा प्रकार उघड झाला. टाइल्स, दारे-खिडक्या, नळ बदलणे, संपूर्ण इमारतीची रंगरंगोटीच्या नावावर सामाजिक न्याय विभागाला ‘चुना’ लावण्यात आला. प्रत्यक्षात 12 लाखांची; मात्र कागदावर 77 लाखांपेक्षा जास्त कामे पूर्ण करण्यात आली. तक्रारीनंतर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, दीड महिन्यानंतरही पथकाला तपासासाठी मुहूर्त सापडलेला नाही.
औरंगाबाद - सामाजिक न्याय विभागांतर्गत संत तुकाराम आणि जुने मिलिंद वसतिगृह नोव्हेंबर 2011 पासून मुलींचे वसतिगृह म्हणून वापरले जात आहे. मुलांना किलेअर्क येथील वसतिगृहात स्थलांतरित केल्यानंतर आता येथे मुलींची दोन वसतिगृहे सुरू आहेत. अनेक वर्षांपासून दुरुस्ती किंवा नूतनीकरण झालेलेच नसल्यामुळे दोन्ही वसतिगृहांचे काम मागील वर्षी पूर्ण (?) करण्यात आले.

अभियंत्यांचे संगनमत
वसतिगृहाच्या गृहपाल व्ही. बी. बागल यांनी मुलींना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी सामाजिक न्याय विभागाचे तत्कालीन आयुक्त आर. के. गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे निधी मिळाला. विभागाला मिळालेल्या निधीतून (डिपॉझिट) 18 जानेवारी 2013 रोजी नूतनीकरणाचे कार्यादेश (वर्क आॅर्डर) काढण्यात आले. ‘साई यश कन्स्ट्रक्शन कंपनी’ने काम केले. मात्र, उपविभागीय अभियंता एस. जी. सनेर आणि कनिष्ठ अभियंता के. जी. गायकवाड यांनीच ‘डमी काँट्रॅक्टर’ उभा केल्याचा संशय आहे.

डीबी स्टार तपास
वर्क आॅर्डरनुसार मोजमाप झाले असता अधिकचे काम झाल्याचा दावा अभियंत्याने केला आहे. मात्र, ‘डीबी स्टार’ने प्रत्येक कामाची प्रत्यक्ष पाहणी आणि तपास केला.
तोट्या न बदलताच अडीच लाखांची नोंद
अडीच लाख रुपये खर्चून नळाच्या तोट्या बसवल्याचेही मोजमाप पुस्तिकेत नोंदवण्यात आले आहे; पण एकही नळाची तोटी बदललेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. चमूने केलेल्या पाहणीतही हा प्रकार उघड झाला. 19 जानेवारी रोजी सुरू केलेले नूतनीकरणाचे हे काम अवघ्या 4 महिन्यांत पूर्ण करून दाखवण्याचा ‘प्रताप’ शाखा अभियंता गायकवाड यांनी करून दाखवला. 26 मे 2013 रोजी काम पूर्ण झाल्याचे नमूद करून कामापेक्षा अधिक रकमेची उचल करण्यात आली आहे.
धक्कादायक वास्तव - रिव्हाइज इस्टिमेट
कंत्राटदाराला 18 जानेवारी रोजी दिलेल्या वर्कआॅर्डरमध्ये 63 लाख 37 हजार 427 रुपयांची रक्कम मंजूर होती. ती प्रस्तावित कामाच्या तुलनेत अधिक होती, तरीही कंत्राटदार अन् स्वत:लाही अधिक लाभ होण्याच्या दृष्टीने अभियंत्यांनी 22 टक्क्यांनी इस्टिमेट रिव्हाइज केले. 14 लाख 15 हजार 921 रुपयांनी देयके वाढवून दिली. 721 सिमेंट गोण्या लागल्याचे मोजमाप पुस्तिकेत नमूद करण्यात आले आहे. एवढ्या गोण्यांमध्ये नव्या इमारतीचे बांधकाम होऊ शकते, असे लक्षात आल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय कंत्राटदार रमेश आमराव यांनी 16 एप्रिल 2014 रोजी सर्व प्रकरणाची मुख्य अभियंता सी. पी. जोशी यांच्याकडे लेखी तक्रार केली.

चौकशीचा फार्स
आमराव यांच्या तक्रारीवरून मुख्य अभियंता सी. पी. जोशी यांनी दक्षता व गुण नियंत्रण मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी कार्यकारी अभियंता बी. जी. पवार यांना 19 मे 2013 रोजी चौकशी करून तीन दिवसांतच वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, गुणनियंत्रण व दक्षताच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिलेल्या आदेशाला आता दीड महिना उलटला, तरीही चौकशीचा साधा एक कागदही पुढे सरकलेला नाही, असा आरोप आमराव यांनी केला आहे.
थेट सवाल - के. जी. गायकवाड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

वसतिगृहांची बोगस बिले सादर करून रक्कम उचलले हे खरे आहे का..?
- हा आरोप खोटा असून उलट उचललेल्या रकमेपेक्षा अधिक कामे केली आहेत.

वर्क आॅर्डरप्रमाणे कामे झालेली नसल्याचे पाहणीतून पुढे आले...
-बी अँड सी म्हटले की, थोडेफार इकडे तिकडे होतेच.

व्हर्टिफाइड टाइल्स फक्त तळमजल्यावर दिसतात. वरच्या मजल्यावर कामच झाले नाही...
-सर्व ठिकाणी टाइल्स बसवून खोल्यांध्येही काम झाले आहे. 15 टक्के अधिक काम केले असून अजूनही काही राहिले असल्यास करून देऊ.
थेट सवाल - सी. पी. जोशी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

संत तुकाराम आणि जुने मिलिंद वसतिगृहाच्या नूतनीकरणासाठी झालेला खर्च अवास्तव आहे...
-माहिती घ्यावी लागेल, मी मुंबईला आहे.

पण आपण तर यापूर्वीच चौकशीचे आदेश दिले आहेत. फक्त चौकशी कुठपर्यंत आली आहे, हे विचारायचे आहे.
-होय, कागदपत्रे वाचून सांगतो. कारण त्याशिवाय मला याप्रकरणी काहीच सांगता येणार नाही.
बोगस कामे दाखवून लुटले
नूतनीकरणासाठी प्रस्ताव देतानाच अधिक रकमेचा दिला. शिवाय एकदा निविदा रिव्हाइज करून रक्कम वाढवली. निविदेत म्हटल्याप्रमाणे कामे केलीच नाहीत; पण मोजमाप पुस्तिकेवर बोगस नोंदी करण्यात आल्या आहेत. या गैरव्यवहाराला कनिष्ठ अभियंता के. जी. गायकवाड आणि उपविभागीय अभियंता एस.जी. सनेर हेच जबाबदार आहेत. मी एसीबीला तक्रार दिली आहे, लोकपालांपर्यंत तक्रार करणार आहे.
-रमेश आमराव, तक्रारकर्ता
माझा संबंध नाही
माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. शाखा अभियंता गायकवाड यांनीच काम पाहिले आहे. विनाकारण माझे नाव यात गोवले जात आहे.
-एस. जी. सनेर, उपविभागीय अभियंता
उलट जास्तीचे काम केले
४मी उचललेल्या रकमेपेक्षा तब्बल 15 टक्के अधिक काम केले आहे. त्यामुळे या प्रकरणात कुठल्याही घोटाळ्याचा प्रश्नच येत नाही.
-हेमंत खेडकर, ठेकेदार