आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

300 विद्यार्थी, रोज 20 किलोमीटरची पायपीट; वसतिगृह बनले, असून अडचण नसून खोळंबा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा परिसरात भाडोत्री जागेत असलेले वसतिगृह. - Divya Marathi
सातारा परिसरात भाडोत्री जागेत असलेले वसतिगृह.

आैरंगाबाद - आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत सातारा परिसरात स्थलांतरित करण्यात आलेल्या वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांसमोर अडचणींचे डोंगर उभे आहेत. शहराबाहेर असलेल्या वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांना जाण्या-येण्याच्या त्रासाबरोबरच अस्वच्छतेच्या प्रश्नांनाही सामोरे जावे लागत आहे. यामुळे या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न समोर येत आहे. 

 

आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची सुरुवात झाली. या अंतर्गत आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासह निवास जेवणाची सोय करण्यासाठी जिल्हास्तरावर वसतिगृहांची सुविधा करण्यात आली. ही वसतिगृहे मात्र आज समस्यांच्या विळख्यात सापडलेली दिसत आहेत. शिक्षण घेणाऱ्यांची सोय व्हावी म्हणून ही योजना असताना प्रत्यक्षात मात्र सोयी मिळण्यासाठीच विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

 

वसतिगृहाची जागाच मुळात चुकीची... 
यापूर्वी सिडको एन-४ परिसरात असलेले वसतिगृह आता सातारा परिसरातील खंडोबा मंदिराजवळ स्थलांतरित करण्यात आले आहे. या वसतिगृहात सध्या सुमारे ३०० विद्यार्थी राहतात. त्यापैकी अनेक जण शहरातील विविध महाविद्यालये किंवा विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. साताऱ्यापासून शहरापर्यंत रोजचा प्रवास करताना या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे वसतिगृह शहरात मध्यवर्ती ठिकाणी असावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आहे. 

 

असुविधांचा अक्षरश: डोंगर... 
सातारा परिसरातील वसतिगृहाची डीबी स्टारच्या प्रतिनिधीने पाहणी केली. स्वयंपाक खोलीच्या परिसरातच खरकटे अन्न तसेच होते. तेथे प्रचंड दुर्गंधी येत होती. जवळच शिजलेल्या भाज्यांचे पातेलेही उघडेच दिसले. शौचालय परिसरात कचराकुंडी तयार झाली होती. स्वयंपाकाच्या खोलीतच तेथे काम करणाऱ्या महिलांच्या चपलाही हाेत्या. अस्वच्छ परिसरात सतरंज्यावर बसूनच विद्यार्थी जेवण करताना दिसले. वसतिगृहाच्या पायऱ्यांवरही कचऱ्यांचे ढीग दिसले. विशेष म्हणजे परिसरात एक तास फिरताना कोठेही वॉचमन दिसला नाही. 

 

विद्यार्थी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात... 
वसतिगृहातील असुविधा आणि जागा बदलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी यापूर्वी अनेकदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. अनेकदा विविध ठिकाणी आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवेळी त्यांच्या पदरी निराशाच आली. गेल्या आठवड्यात या विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सिडको-एन-८ येथील कार्यालयात रात्री ११ वाजता येत ठिय्या दिला. आपली कैफियत मांडण्यासाठी सुमारे १५० विद्यार्थी पायी चालत आले होते. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली. 

 

अस्वच्छतेवर तत्काळ उपाययोजना... 
शहराच्या मध्यवर्तीभागात वसतिगृहासाठी जागा नाही. यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. स्वयंपाकघरातील अस्वच्छतेवर तत्काळ कारवाई होईल. वॉर्डनकडून अहवाल मागवणार आहे. येथे अचानक भेट देऊन परिस्थिती पाहणार आहे. 
- गजानन फुंडे, प्रकल्प अधिकारी 

बातम्या आणखी आहेत...