आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स वर्षभरासाठी स्थगित, पायाभूत सुविधा नसल्याचे विद्यापीठाने केले मान्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम अखेर एक वर्षासाठी स्थगित केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमासाठी विद्यापीठात पायाभूत सुविधाच नसल्याचा मुद्दा ‘दिव्य मराठी’ने उपस्थित केला होता. हा मुद्दा मान्य करत सोमवारी विद्यापीठाने पुढील शैक्षणिक सत्रापासून हा कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

"हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी विद्यापीठात नगण्य सुविधा' या मथळ्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने १४ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्तामध्ये शहरातील दोन महाविद्यालयांच्या तुलनेत विद्यापीठात काहीच सुविधा नसल्याचा उल्लेख होता. त्याशिवाय फॅकल्टी नेमले नाहीत, अभ्यासक्रम तयार नसल्याचेही निदर्शनास आणून दिले होते. तरीही विद्यापीठाने प्रत्येक सत्रासाठी ६० हजार रुपये आकारून हा कोर्स सुरू करण्याचा हट्ट धरला होता. मात्र ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर विद्यापीठाने १६ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद उपकेंद्रातील व्यवस्थापन परिषद बैठकीत वर्षभर हा कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आणि बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे यांनी पायाभूत सुविधा नसल्याचे मान्य करत जून २०१६ पासून इन्फ्रास्ट्रक्चर उभारल्यानंतरच कोर्स सुरू करण्याचे ठरवले.
१४ ऑगस्टला प्रकाशित वृत्त.

दौऱ्याचा अहवाल नाही
‘लंचहोम’ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीचा ‘हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाने १४ लाखांची युरोप सहल घडवून आणली. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी मदन यांच्या नेतृत्वात सात सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अभ्यासाच्या नावाखाली इटली, फ्रान्स, जर्मनीसह सहा देशांचा दौरा केला. १४ लाखांचा चुराडा करून १४ ऑगस्ट रोजी ही अभ्यास समिती परतली. या समितीने अहवाल सादर केला काय, असा प्रश्न ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने कुलगुरूंना विचारला असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंझा, प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि प्रभारी वित्त लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनीही यासंदर्भात भाष्य केले नाही. त्यामुळे दौऱ्यातून नेमकी काय फलनिष्पती झाली, हा सध्या तरी संशोधनाचा विषय आहे.