आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन्स्पेक्टरमुळे राजू बन गया जंटलमन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घरची गरिबी. वडिलांची कमाई तुटपुंजी. त्यातच आई अर्धांगवायूने आजारी. अशा स्थितीत त्याने चोरीचा मार्ग धरला. सराईत गुन्हेगार झाला. पुढे पोलिसांच्या हाती लागला, पण फौजदाराने त्याच्यातील भला माणूस शोधला. विशीतील हा तरुण चायनीज पदार्थ बनवण्यात निपूण असल्याचे सिटी चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल फुला यांनी हेरले आणि एका चोराचे सन्मानपूर्वक जीवन बहराला आले.
राजू (नाव बदलले आहे.) नावाच्या मुलाची ही कथा आहे. त्याचे वडील एका हॉटेलात वेटर आहेत. आजारपणामुळे आई काम करू शकत नव्हती. वडिलांच्या तोकड्या कमाईवर घर चालत नव्हते. त्यामुळे जेमतेम 19 वर्षांचा असतानाच राजू चोरीच्या मार्गाला लागला. कोणाच्याही घराबाहेर पडलेल्या भंगार वस्तू तो बेमालूमपणे चोरायचा. अशा चोरीची तक्रार आली की पोलिस आधी राजूचा शोध घेत असत. त्याला अटकही केली जायची. सुटल्यानंतर राजू पुन्हा तोच गुन्हा करायचा. चोरी हेच आपल्या उपजीविकेचे साधन असल्याचा समज करून घेतलेल्या राजूची गाठ एकदा उपनिरीक्षक राहुल फुला यांच्याशी पडली. फुला यांनी त्याचे प्रबोधन केले. तो उत्तम चायनीज कुक असल्याचे त्यांनी हेरले आणि त्याला कामाला लावून दिले. मागील सात महिन्यांपासून राजूच्या नावावर एकही गुन्हा नोंदवला गेलेला नाही.
असा लाभला परीसस्पर्श! - राजूच्या चोरीचा तपास काही महिन्यांपूर्वी फौजदार फुला यांच्याकडे आला. परिस्थितीमुळे तो गुन्हेगारीकडे वळल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला मित्रासारखी वागणूक दिली. चोरी सोडली तर तुला काय करता येईल, असे फुला यांनी विचारले. त्यावर मला उत्तम चायनीज पदार्थ करता येतात, असे राजूने सांगितले. हीच कला तुला रोजगाराची संधी देऊ शकते, असे त्याच्या मनावर बिंबवले गेले. काही दिवस लोटले. एके दिवशी राजू फ्रॉइड राइस घेऊन फुला यांच्याकडे आला. संदीप भोगले यांच्या संदीप केटरर्समध्ये राजू चायनीज पदार्थ तयार करत होता. राजू अत्यंत चांगला आणि मेहनती असल्याचे भोगले यांनी सांगितले.