आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक ठणठणाट, पण ‘होऊ द्या खर्च’; ‘निमा’च्या पदाधिकार्‍यांशी केला महापौरांनी अजब युक्तिवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ‘निमा’ने सव्वादोन कोटी रुपयांच्या वृक्ष लागवडीचा भार उचलण्याची तयारी दाखवूनही महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी ‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्तव्याचा भाग’, असे अजब कारण देत ‘होऊ द्या खर्च’चा बाणा कायम ठेवला. उद्योजकांनी सांगाल तेथे झाडे लावण्यापासून वृक्षारोपणाला महापालिकेचे नाव देण्यापर्यंत घसाफोड केल्यानंतर महापौरांनी ‘विचार करून सांगतो’, असे म्हणत अप्रत्यक्षपणे प्रस्ताव फेटाळला.

रखडलेल्या कामांंना रिकामी तिजोरी कारणीभूत असल्याचा दावा मनसेकडून केला जात आहे. जुन्या कामांचा स्पिल ओव्हर सातशे कोटींपर्यंत असताना कुंभमेळ्याचा भार पेलवणार नाही, असे निवेदनही मध्यंतरी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना दिले गेले. कर्जमर्यादा संपल्यामुळे 400 कोटींपेक्षा अधिक कर्ज घेता येणार नाही, अशी हतबलताही व्यक्त झाली. नाशिककरांना दाखवलेले नवनिर्माणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खासगीकरणाचा मंत्रही आळवला गेला. त्यातून गोदापार्क, फाळके स्मारक, शिवाजी उद्यान, पेलिकन पार्क असे प्रकल्प करण्याचे खुद्द राज ठाकरे यांनी जाहीर केले. वाहतूक बेटांच्या विकासाठी उद्योजकांना साकडेही घातले गेले. त्यामुळे उद्योजक पुढे येत असताना मनसेने वेगळीच भूमिका घेतली.

‘निमा’च्या पदाधिकार्‍यांना बुधवारी त्याचा प्रत्यय आला. पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने प्रसिद्ध केलेल्या निविदेत सहा विभागांत झाडे लावण्यासाठी व देखभालीसाठी प्रत्येकी 37 लाख 56 हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे. हा एकूण सव्वादोन कोटींचा खर्च करण्याची तयारी पदाधिकार्‍यांनी दाखवली. मात्र, महापौरांनी पालिकेचे कर्तव्यपालन स्पष्ट करीत ‘तुम्ही स्वतंत्र कार्यक्रम राबवा’, असा अजब सल्ला दिला. उद्योजकांनी त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांनी महापालिकेचे कर्तव्य, न्यायालयातील याचिका अशी कारणे देत आपला हट्ट कायम ठेवला. त्यामुळे चहापान घेत उद्योजकांना परतावे लागले.
असा झाला ‘संवाद’
मनीष कोठारी : उद्योगांच्या सीएसआर अ‍ॅक्टिव्हिटीतून महापालिकेला एक लाख वृक्ष लागवड व जतनाची जबाबदारी निमा स्वीकारू इच्छिते.

महापौर : स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य म्हणून वृक्ष लागवड करावीच लागेल. त्याचप्रमाणे, न्यायालयात याचिकाही दाखल आहे.

मनोज पिंगळे : यातून बचत झालेल्या पैशांचा उपयोग अन्य कामांच्या कर्तव्यपालनासाठी करता येईल.

महापौर : तसे करता येणार नाही. निविदाही निघाली असून, तुम्ही स्वतंत्रपणे वृक्ष लागवड करा. नाशिकचा फायदाच होईल आणि महापालिकाही काहीतरी स्वतंत्ररीत्या करते हे दिसू द्या ना...

मंगेश पाटणकर : तुम्ही सांगाल तेथे झाडे लावू. त्यावर आमचे नावही नसेल. फक्त पालिकेची बचत होऊन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे.

महापौर : केवळ लागवड करून उपयोग नाही, तर जतन झाले पाहिजे. अनेक आरंभशूरांकडून घोषणा होतात. वाहतूक बेटांच्या वेळीही त्याचा प्रत्यय घेतलाय.

पाटणकर : याच निविदेत ‘निमा’शी ‘थर्ड पार्टी’ म्हणून करार करून घ्या. मोफत वृक्ष लागवड व संवर्धन करू. त्यासाठी कंपन्या पाणी व कर्मचारीही देतील.

महापौर : तुमच्या प्रस्तावावर विचार करतो. तुम्ही स्वतंत्र वृक्ष लागवड करू शकता. तसे झाले तर जास्तच वृक्ष लागतील.