आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्क्या बांधकामाने अडवला हक्काचा रस्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानपुरा परिसरातील एकनाथनगर रहिवासी सहकारी गृहनिर्माण संस्था आणि गृहराज सोसायटीमधील मंजूर आराखड्यातील रस्त्यावर दोन रहिवाशांनी अतिक्रमण करून हा रस्ताच गिळंकृत केला आहे. म्हाडा आणि मनपातील अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे जो रस्ता येथील नागरिक गेल्या 20 वर्षांपासून वापरत होते तोच गायब झाला आहे.

1965 मध्ये एकनाथनगर रहिवासी सहकारी गृहनिर्माण संस्था, तर 1989 मध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील कर्मचार्‍यांसाठी म्हाडाने शंभर गाळ्यांची गृहराज सोसायटी स्थापन केली. या दोन्ही सोसायटींच्या मधून हा 15 फुटांचा रस्ता होता. हा रस्ता एकनाथनगर रहिवासी सहकारी गृहनिर्माण सस्थेच्या समाजमंदिराच्या पाठीमागून जात होता. गृहराज हाउसिंग सोसायटीतील गाळा क्रमांक 412 ते 411 मधून जाणार्‍या या रस्त्याची सोसायटीच्या मंजूर रेखांकनात नोंद आहे. 20 वर्षांपासून सोसायटीचे लोक या रस्त्याचा वापर करत होते, पण आता या रस्त्यावर अतिक्रमण करून टपाल खात्यातील रेकॉर्ड अधिकारी पी. डी. भांडेकर यांनी एक पक्की खोली, स्नानगृह आणि स्वच्छतागृह बांधले. दुसर्‍या बाजूने गाळा क्रमांक 411 चे गाळाधारक जी. टी. जाधव यांनी सुरक्षा भिंत बांधून हा रस्ताच गिळंकृत केला. या अतिक्रमणामुळे रस्ता गायब झाला असून परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. मैदानाला सुरक्षा भिंत बांधल्यास गृहराज हाउसिंग सोसायटीतील काही लोकांचा मुख्य रस्ताच बंद होणार आहे.

काय म्हणतात जबाबदार ?
मी नुकताच पदभार घेतला आहे. संचिका तपासून संबंधित अधिकार्‍यांमार्फत चौकशी करून कारवाई करणार आहोत. कोणाचे अतिक्रमण असल्यास ते नक्कीच पाडणार. -किशोर बोर्डे, उपायुक्त तथा अतिक्रमण हटाव विभागप्रमुख.

जबाबदारी पालिकेची आहे
आम्ही 18 जुलै रोजी स्थळपाहणी केली होती. गाळा क्रमांक 412 चे गाळेधारक भांडेकर यांनी त्यांच्या उत्तरेस असलेल्या 15 फूट रस्त्यावर 2.40 मीटरचे अतिक्रमण केले आहे. 411 क्रमांकाचे गाळेधारक जी. टी.जाधव यांनीही उत्तरेस अतिक्रमण केले आहे. दोघांनीही रस्त्याच्या जागेत अतिक्रमण केल्याची आमच्याकडे नोंद आहे. याचा नकाशा तयार करून त्याची एक प्रत पालिकेला पाठवली आहे. एकनाथनगर वसाहतीतील रस्ते मनपाकडे हस्तांतरित करण्यात आलेले असल्याने अतिक्रमण काढण्याची जबाबदारी त्यांचीच आहे.-संतोष बोबडे, कार्यकारी अभियंता, म्हाडा

आमचे कसलेही अतिक्रमण नाही
सोसायटी आणि मनपाच्या नोटिसांना उत्तरे दिली आहेत. त्यांचे आरोप आधारहीन तसेच चुकीचे आहेत. म्हाडाने मला वहिवाटीसाठी दिलेल्या जागेचा वापर आम्ही करत आहोत. त्यावर पालिकेनेच आम्हाला आर्थिक दुर्बल घटक या विशेष योजनेतून स्वच्छतागृह बांधून दिले आहे. आमचे बांधकाम 30 वर्षांपूर्वीचे आहे. ते अनधिकृत ठरवण्याचा अधिकार सोसायटीच्या अध्यक्षाला नाही.- हेमंत भांडेकर, अतिक्रमणधारकाचा मुलगा