आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमधील मोदींचे भाषण स्फुल्लिंग चेतवणारे; विविध राजकीय नेते व अभ्यासकांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला झालेली गर्दी कुणीच नाकारत नाही, परंतु ही गर्दी मतांमध्ये कितपत परिवर्तित होईल, याबद्दल राजकीय नेते आणि अभ्यासक मात्र साशंक आहेत. मोदींचे भाषण मतदारांमध्ये स्फुल्लिंग चेतवणारे असल्याची प्रतिक्रियाही मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
गर्दी चांगली - नरेंद्र मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असले तरी याचे मतांमध्ये कितपत रूपांतर होते हे विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरच समजेल. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड असून ७ ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर पुन्हा चित्र पालटेल. राजू वैद्य, शहरप्रमुख, शिवसेना

नागरिक ऐकायला जातात
देशातील नागरिक भाषण ऐकण्यासाठी जातात. चौदा विधानसभा मतदारसंघांतून नागरिक सभेला आल्याने गर्दी मोठी होती. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने नागरिकांना सभेला गाड्या पाठवून घेऊन येतो. मोदींच्या सभेतील गर्दीचा परिणाम विजयात होणार नाही.
सुधाकर सोनवणे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

जनमतावर प्रकाश
मोदींचे भाषण जनमतावर प्रकाश टाकणारे होते. तीन मुद्द्यांमध्ये विभागल्या गेलेल्या भाषणात केंद्रातील साठ दिवसांतील यश व राज्यातील पंधरा वर्षांतील अपयश. जन-धन योजनेद्वारे जोडले गेलेले पाच कोटी नागरिक, औरंगाबादला पर्यटनात नंबर वन करणे, औद्योगिक क्षेत्रात रोजगार निर्माण करणे आदी बाबी नागरिकांना भावल्या. प्रा. श्याम शिरसाट, लोकप्रशासन विभाग

मतदारांना आकर्षित करणारे
मराठवाड्याच्या दृष्टीने मतदारांना आकर्षित करणारे प्रचारकी भाषण नरेंद्र मोदी यांनी केले. हे भाषण फार नावीन्यपूर्ण नव्हते. आर्थिक सुधारणांना काँग्रेस सरकारच्या काळातच प्रारंभ झाला होता. मोदींनी त्यासंबंधीच सांगितले. गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी युती नसल्याने मतविभाजनाचा फटका मात्र बसणार आहे. प्रा. बी. एस. वाघमारे

सभास्थळी पार्किंगसाठी धांदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ऐकण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यांतून मोठी गर्दी लोटली होती. मात्र गरवारे स्टेडियमच्या सभोवताली चारचाकी व दुचाकी पार्किंगसाठी मोठी धांदल उडाली होती. लोक जागा दिसेल तेथे वाहने पार्क करून मोकळे झाले. पोलिसांच्या नोंदीनुसार या सभेला सव्वा ते दीड लाखाची गर्दी होती. चार वाजेपासून लोकांनी मैदानाकडे जाण्यासाठी गर्दी केली होती. लोंढेच्या लोंढे मैदानाकडे उलटले होते. पोलिसांनी वोक्हार्टपासून वाहनबंदी केली होती. सिडको एन-१ मधील बहुतांश गल्ल्यांमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी वाहने उभी केली होती.
सभा सुरू झाल्यानंतर नागरिक मिळेल तेथून मैदानाकडे शिरण्याचा प्रयत्न करत होते. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनाही लोक जुमानत नव्हते. ईएसआय रुग्णालयाच्या मागील बाजूने काही तरुण गेटचे कुलूप तोडून मैदानाकडे जाण्यासाठी प्रयत्न करत होते. प्रोझोनकडून गरवारे मैदानाकडे जाणारा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. केवळ गरवारे स्टेडियमच्या मुख्य दरवाजाकडून जाण्याची विनंती पोलिस करत होतो. सभा सुटल्यानंतर दीड तास जळगाव रोडवर वाहतूक खोळंबली होती.