आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आणखी किती जणांचा बळी जाण्याची वाट पाहताय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिकलठाणा एमआयडीसीत जीटीएलच्या लोंबकळणार्‍या तारांमुळे गेल्या वर्षी एकाचा मृत्यू झाला, तर गेल्या आठवड्यात एक जण बालंबाल बचावला. इतर भागातही खांब पडणे, तारा लटकण्याचे प्रकार घडत आहेत. असे असतानाही कुंभकर्णी झोपेतील जीटीएलला जाग आली नसल्यामुळे या भागातील नागरिक व उद्योजक संतप्त झाले आहेत.

जीटीएल आणखी बळी जाण्याची वाट बघत आहे का? असा खडा सवाल नागरिकांनी केला आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याप्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे येथील उद्योजक याबाबत लवकरच उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन औद्योगिक क्षेत्रावरील संकट दूर करण्याची मागणी करणार आहेत. चिकलठाणा एमआयडीसीतून 11 केव्हीची वीज लाइन गेली आहे. या तारा लोंबकळत असल्यामुळे जीवघेण्या ठरत आहेत. विशेषत: वोक्हार्ट रिसर्च लॅबपासून गोल्डन ड्रीम्स या नवीन बांधकाम साइटकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर तर या तारा खूपच खाली आल्या आहेत. गेल्या वर्षी एक वाहन या तारांना चिकटल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला होता. यानंतर जीटीएलने एक खांब बसवून काही तारा ताठ केल्या, पण अजूनही अनेक ठिकाणी तारा लटकत आहेत. उद्योजकांनीही या तारांची उंची वाढवण्याच्या मागणीसाठी जीटीएलचे उंबरठे झिजवले, पण एक बळी गेल्यावरही जीटीएलचे डोळे उघडलेले नाही. यावर डीबी स्टारने 7 ऑगस्टच्या अंकात ‘तारांचा झोका, जीटीएलच्या झोपा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून वाचा फोडली. त्यावर वाचकांच्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया..

युरोप पॅटर्न राबवावा
युरोपमध्ये भूमिगत केबलिंग किंवा खांबावरील केबल्सना प्लास्टिकचे कोटिंग केलेले आढळते. यामुळे तारा घासून शॉर्टसर्किट होण्यासारखा धोका राहत नाही. जीटीएलला हे शक्य नसेल तर किमान आहे त्या तारा वर ओढून घ्याव्यात.
राजेंद्र तवार, संचालक, रजनीश ऑफसेट अँड प्रिंटर्स


उद्योगमंत्र्यांना भेटणार
आमच्या कर्मचार्‍यांना येथून ये-जा करावी लागते. त्यामुळे आता जीटीएलवर अवलंबून न राहता आम्ही थेट उद्योगमंत्र्यांना भेटून याबाबत तक्रार करू.
रवी पळसवाडीकर, उद्योजक


आम्ही तारा वर करू
लटकणार्‍या तारांच्या विरोधात आम्ही दोनदा निवेदन दिले. एकदा जीटीएलच्या अभियंत्याला सडका हार घातला, तर एकदा अर्धनग्न आंदोलन केले. तरीही जीटीएलला जाग आलेली नाही. आता जीटीएलने तारा उंच केल्या नाहीत, तर आम्ही स्वत: त्या वर करू. संदीप कुलकर्णी, मनसे


पुन्हा दुर्घटना होऊ शकते
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे झाडे-झुडपे वाढली आहेत. त्यांची उंची तारांच्या खूप जवळ गेल्याने त्यात वीज प्रवाह उतरून मोठा अपघात होण्याचा दाट धोका आहे. जीटीएल आणखी किती बळींची वाट बघत आहे?
पंकज संकपाळे, उपाध्यक्ष, काँग्रेस