आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी दर्डांनी किती निधी आणला?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपाच्या 33 वॉर्डांचा समावेश असलेल्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील रस्त्यांसाठी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी किती निधी आणला ते सांगावे व नंतरच रस्त्यांबाबत बोलावे. रस्त्यांच्या नावावर काही नेते राजकारण करत आहेत. तसे न करता शहरासाठी काय योगदान देता येईल ते त्यांनी पाहावे, असे आवाहन महापौर कला ओझा यांनी रविवारी केले.


महापौर व पदाधिकार्‍यांनी रविवारी दर्डा यांच्या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात रस्त्यांची पाहणी केली. सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारीतील रस्त्यांबाबत महापौरांनी खात्याच्या अधिकार्‍यांची रस्त्यावरच खरडपट्टी काढली. दोन तास रस्ते पाहणी केल्यानंतर निवासस्थानी झालेल्या पत्रपरिषदेत दर्डा यांच्यावर हल्ला चढवताना महापौर म्हणाल्या, मनपा काम करत नाही, खड्डे बुजवत नाही अशी बदनामी केली जात आहे; पण मनपा आपल्या परीने काम करतच आहे. जनतेशी संबंधित या विषयावर काही नेते राजकारण करत आहेत. त्याऐवजी शहराला पावसाळा संपताच पॅचवर्क.येईल, ते त्यांनी पाहावे. रस्त्यांच्या कामासाठी सरकार निधी देत नाही असा आरोप करून महापौर म्हणाल्या, पूर्व मतदारसंघात 33 वॉर्ड आहेत. तेही ‘त्यांचे’ मतदारच आहेत. मग आमदार म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी किती निधी आणला? पाच पैसेही त्यांनी आणले नाहीत. त्यांनी आधी निधी आणावा मग मनपाकडे बोट दाखवावे. मनपा रस्ते करू शकत नाही, अशी टीका करण्यापेक्षा दर्डांनी आपला मतदारसंघ सांभाळला तरी खूप आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागावर टीका
या पाहणीच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कृष्णा वाघ उपस्थित होते. महापौरांनी त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याकडील रस्त्यांमुळे मनपाला नागरिकांचे शिव्याशाप घेण्याची वेळ आली आहे, असे सुनावले. तुम्ही तुमच्या अखत्यारीतील रस्ते कधी दुरुस्त करणार, असा जाबही विचारला. तुमचे मंत्री भुजबळ शहरात आले तेव्हा त्यांना खराब रस्ते दिसले नाहीत का, असेही त्या म्हणाल्या.
या वेळी सभागृहनेते सुशील खेडकर, गिरजाराम हाळनोर, राजू वैद्य, हुशारसिंग राजपूत, वीरभद्र गादगे, गोपाल कुलकर्णी, शहर अभियंता सखाराम पानझडे व इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती.


सर्व आमदारांनी निधी द्यावा
शहरात 8 आमदार आहेत. या सर्वांनी रस्त्यांसाठी प्रत्येकी 2 कोटी दिले तरी बरेच रस्ते होतील, असे सांगत ओझा म्हणाल्या, यासाठी आम्ही सर्व आमदारांना विनंती करणार आहोत. स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे म्हणाले, आमदार- खासदारांच्या निधीतून किमान 5 रस्ते तरी होतील.


पूर्वमध्ये पाहणी दौरा
महापौर, सभापती यांनी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि इतर पदाधिकार्‍यांसोबत उच्च् न्यायालयासमोरील रस्ता, वसंतराव नाईक चौक ते हसरूल, जळगाव रोड ते मध्यवर्ती जकात नाका, हडको टीव्ही सेंटर या भागांतील रस्त्यांची बारकाईने पाहणी केली.


बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते
0 नगर नाका ते बाबा पेट्रोल पंप
0 क्रांती चौक ते चिकलठाणा
0 वसंतराव नाईक चौक ते हसरूल
0 हसरूल ते सुभेदारी
0 स्टेशन ते सुभेदारी
0 पंचवटी ते लोखंडी पूल
0 बीड बायपास रस्ता
(सातारा परिसर)