आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या पस्तिशीतच सगळं आयुष्य जगून टाकणं कसं चालेल? -अभिनेते डॉ. मोहन आगाशे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आजकाल जगण्याचे संदर्भ, अर्थ बदलत चालले आहेत. पण वयाच्या पस्तिशीतच सगळं आयुष्य जगून टाकणं कसं चालेल, असा सवाल प्रख्यात अभिनेते आणि मानसशास्त्राचे अभ्यासक डॉ. मोहन आगाशे यांनी केला. जगण्याला अर्थ हवा असेल तर कुठल्यातरी कलेशी नाते जोडा, असा सल्लाही त्यांनी दिला. 

एमजीएम, शांती नर्सिंग होम आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपट चावडी उपक्रमात रविवारी (२६ फेब्रुवारी) रुक्मिणी सभागृहात ‘अस्तू’ हा डॉ. आगाशे, इरावती हर्षे, मिलिंद सोमण, अमृता सुभाष यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट दाखवण्यात आला. सुमित्रा भावे यांनी लिहून दिग्दर्शित केलेल्या ‘अस्तू’मध्ये वृद्धांच्या समस्या आणि त्यांची तरुण पिढीकडून होणारी हाताळणी सांगण्यात आली आहे. चित्रपट सादरीकरणानंतर डॉ. आगाशे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. ते गेल्या ५० वर्षांपासून अधिक काळ मराठी, हिंदी चित्रपट नाट्यसृष्टीत कार्यरत आहेत. नव्या विषयांची मांडणी असलेल्या अनेक चित्रपटांत त्यांनी कामे केली आहेत. तो संदर्भ देत ते म्हणाले की, शाळा-कॉलेजात नाटक किंवा छंद जोपासला जातो. 

पुढे मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा अन्य मोठ्या अभ्यासक्रमाचे ओझे अंगावर घेतले की छंद मागे पडतात. आता तर तरुण मुलांना वयाच्या ३५व्या वर्षात सगळे काही करायचे असते. घर, गाडी, बंगला, प्रतिष्ठा, पैसा हे सर्व हवे असते. पण एवढ्या कमी वयात हे सगळे मिळवले तर पुढे काय करायचे, असा नवा प्रश्न निर्माण होतो. त्यातून बरीच गुंतागुंत होऊ लागली आहे. खरेतर ज्या वयात जे करणे अपेक्षित आहे तेच केले तर आयुष्य मार्गी लागत असते. 

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांविषयी ते म्हणाले की, आपले शरीर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून भौतिकदृष्ट्या एक मांसाचा गोळा आहे. या गोळ्याला भौतिकतेचे नियम लागणारच. कणाकणाने हा मांसाचा गोळा झिजत जाणार हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. मृत्यू म्हणजे जगाचा निरोप घेणे आहे. त्याची तयारी कधी, कशी करायची हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. मात्र, जगण्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. त्याकरिता कोणत्यातरी कलेशी नाते जोडावे. डॉक्टरांकडून मिळणारे रिपोर्ट पाहण्यापेक्षा आपल्या जगण्याला अर्थ आहे की नाही ते बघा, असा सल्लाही त्यांनी दिला. या वेळी रसिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जन्म होतो म्हणजे काय? 
डॉ. आगाशे म्हणाले की, एका शरीरातून दुसरे शरीर निर्माण होते आणि ते जेव्हा श्वास घेऊ लागते तेव्हाच खऱ्या अर्थाने जन्म झाला असे मानले जाते. मृत्यूच्या वेळी हा श्वास थांबतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणून वृद्धत्व, मृत्यूकडे भावनिकतेने बघून चालणार नाही, तर तरुणपणीच त्याचा विचार करावा लागणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...