आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅसचा टँकर उलटला, चालक जखमी, पोलिसांनी खोजेवाडी फाट्यावरून वाहतूक वळवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- भरधाव गॅसचा टँकर हूक तुटल्याने उलटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाल्याची घटना नवीन मुंबई महामार्गावरील खोजेवाडी फाट्यावर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. अपघातानंतर टँकर पूर्ववत करताना गॅस गळतीची शक्यता लक्षात घेऊन महामार्गावरील वाहतूक जुन्या नाशिक मार्गाने वळवण्यात आली होती. शिवाय अग्निशमन दलाचे दोन बंबही घटनास्थळी ठेवण्यात आले होते.

मुंबई येथून एचपी कंपनीचा गॅस घेऊन टँकर (एमएच-४३, यू- ४२४० ) पहाटे नवीन मुंबई महामार्गाने औरंगाबादकडे येत होता. या टँकरला ट्रॉलीने ट्रकच्या केबीनशी जोडण्यात आलेले होते. भरधाव असलेल्या या टँकरला समोरून आलेल्या एका वाहनाने खोजेवाडी फाट्यानजीक हुलकावणी दिली. त्यामुळे टँकरच्या ट्रॉलीचे एकमेकांना जोडलेले हूक पुलाजवळ तुटले. त्यामुळे टँकरची ट्रॉली गॅसच्या टँकसह मुख्यमार्गावरून खाली जात दहा फूट खोल जाऊन उलटली. टँकरची केबिन मुख्य महामार्गावरच थांबली. यात टँकरचालक सलीम अन्सारी (४५, रा. झारखंड) जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पोलिसांनी घाटी रुग्णालयात हलविले. टँकरमध्ये एचपी कंपनीचा गॅस असल्याने वाळूज एमआयडीसी पोलिसांनी काळजी घेऊन सर्वप्रथम नवीन मुंबई महामार्गावरील वाहतूक थांबवली. वाहतूक भांगसीमाता गडामार्गे नाशिक मार्गावर वळवण्यात आली. त्यानंतर एमआयडीसीचे दोन बंब घटनास्थळी बोलावण्यात आले. मुख्य महामार्गापेक्षा दहा फूट खोलवर उलटलेल्या टँकर ट्रॉलीला चार जंबो क्रेनने सरळ करण्यात आले. त्याच स्थितीत टँकर ट्रॉली हळूहळू मुख्य महामार्गावर घेण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. याकामी सावधानता बाळगल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी सांिगतले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

एचपी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
अपघातानंतर घटनास्थळी काही प्रमाणात गॅसची गळती झाली होती. ही माहिती मिळताच एचपी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देवेंद्र काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सोबत आणलेल्या सुरक्षा गार्डने होणारी गॅस गळती रोखण्यात यश मिळवले. त्यात सुरक्षिततेसाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पाचारण केले. या अपघातग्रस्त टँकरमध्ये सुमारे १७.५० टन गॅस होता. त्यामुळे घटनास्थळी मोठी खबरदारी घेतल्याने हानी टळली.