आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेंद्र्यात लवकरच 'एचपी'चा ऑइल डेपो, डीएमआयसीत १०० एकर जागा देण्यास मान्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद परिसरात लवकरच हिंदुस्थान पेट्रोलियमचा ऑइल डेपो होऊ घातला आहे. यासाठी डीएमआयसीने १०० एकर जागा द्यावी, अशी मागणी करण्यात आली असून पेट्रोलियम गॅस सल्लागार समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत यास तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याचे या समितीचे सदस्य, खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. शेंद्रा परिसरात हा ऑइल डेपो होणार असून डेपो झाल्यानंतर शहराचे करमाड येथील पानेवाडी ऑइल डेपोवर असलेले अवलंबित्व कमी होईल.

डीएमआयसीच्या रूपाने नवीन शहर उभारले जाणार असल्याने येथे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांनी ऑइल डेपो उभारण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी १०० म्हणजेच ३०० एकर जागेची मागणी डीएमआयसीकडे केली होती. परंतु फक्त १०० एकर जागा देण्यात येणार असल्याचे संकेत डीएमआयसीने दिले आहेत. तेथे हिंदुस्थान पेट्रोलियम ऑइल डेपो सुरू करेल, त्यानंतर अन्य दोन कंपन्यांनाही काही जागा दिली जाणार आहे. डेपो झाल्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम येथे बॉटलिंग प्लांट सुरू करू शकतो, तशी त्यांची तयारी असल्याचे खैरे यांनी सांगितले.

मनमाडहून पाइपलाइन
दरम्यान,येथे ऑइल डेपो उभारतानाच येथे ऑइल पोहोचते करण्यासाठी थेट मनमाडहून पाइपलाइन केली जाऊ शकते. तशी चाचपणीही करण्यात येत असल्याचे खा. खैरे यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत रेल्वेने येथे इंधन आणले जाईल. त्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशीही आपण बोललो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टंचाई नाहीच
मनमाडयेथील पानेवाडी ऑइल डेपोच्या ठिकाणी काही तांत्रिक कारणाने टंचाई निर्माण होते. अनेक वेळा वाहतूकदारांमुळेही शहरात इंधन टंचाई निर्माण होते. शहराच्या परिसरातच ऑइल डेपो झाला तर अशा टंचाईतूनही औरंगाबादकरांची मुक्तता होईल.