औरंगाबाद- १४ दिवसांपूर्वी गोपीनाथरावांच्या पावलावर पाऊल ठेवत मीदेखील संघर्ष यात्रेला सुरुवात केली. मला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत साऱ्यांनाच साशंकता होती. मात्र, लोकांनी माझ्यावर भरपूर प्रेम केले. या १४ दिवसांच्या संघर्ष यात्रेत मी ताईची ताईसाहेब झाले, अशा भावुक शब्दांत पंकजा मुंडे-पालवे यांनी पक्षांतर्गत विरोधकांना टोला लगावला. जयभवानीनगर येथे मंगळवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या.
गोपीनाथ मुंडेंनी मराठवाड्यात रुजवलेली कार्यकर्त्यांची पाळेमुळे कितपत मजबूत आहेत, त्यांच्या अचानक जाण्याने भाजपवर काही परिणाम झाला आहे का, हे जाणून घेण्यासाठी तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून पंकजा यांच्या संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्याच काही नेत्यांनी, राजकीय अभ्यासकांनी प्रतिसादाविषयी शंका उपस्थित केली. त्याचा थेट उल्लेख न करता पंकजा यांनी संघर्ष यात्रेने नेमके त्यांना काय मिळवून दिले हेच अधोरेखित केले. लोकांचे प्रेम, आत्मीयता मिळाली आहे, असे त्यांनी वक्तव्यातून स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, या यात्रेत जनतेने मला डोक्यावर घेतले. आजही सभेसाठी येताना रस्त्याच्या दुतर्फा महालक्ष्मींचे मुखवटे तसेच साहित्य विक्री करणाऱ्या महिला उभ्या होत्या. त्या मला हात दाखवून आशीर्वाद देत होत्या, असा प्रतिसाद १४ दिवसांत मिळाला. गोपीनाथरावांच्या संघर्ष यात्रेनंतर सत्तापरिवर्तन झाले त्याच पद्धतीने राज्यात सत्तापरिवर्तन होईल, असेही त्या म्हणाल्या.
इराणी यांनी संघर्ष यात्रेचा पहिल्या टप्प्यातला समारोप नसून हे विजयाचे पहिले पाऊल असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडेंबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, भाजपत प्रवेश केला तेव्हा त्यांनी माझी ओळख माझी लेक अशी करून दिली होती. राज्यात सत्तापरिवर्तन हीच मुंडे यांना खरी श्रद्धांजली असेल. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर गोळीबार, मुंबईत महिलांवर हल्ले करण्यात आले, याचीही आठवण त्यांनी करून दिली. प्रास्ताविक शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांनी केले. हेमंत खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ बागडे, सुजितसिंह ठाकूर, आमदार सुधाकर भालेराव, एकनाथ जाधव, अतुल सावे, भागवत कराड, शिरीष बोराळकर, संजय केणेकर उपस्थित होते.