आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम कार्ड बदलून शंभर जणांना लुबाडणारा अटकेत, आरोपीचे केवळ सातवीपर्यंतचे शिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशभरातील शंभरपेक्षा अधिक लोकांना लुबाडणा-याकडून जप्‍त केलेले एटीएम कार्ड दाखवताना पोलिस अधिकारी. - Divya Marathi
देशभरातील शंभरपेक्षा अधिक लोकांना लुबाडणा-याकडून जप्‍त केलेले एटीएम कार्ड दाखवताना पोलिस अधिकारी.
औरंगाबाद - अवघे सातवीपर्यंत शिक्षण असतानादेखील तो एटीएममध्ये जाणाऱ्या लोकांना मदतीचे आमिष दाखवून लाखो रुपये चोरत होता. यासाठी देशभर कारमध्ये फिरून त्याने जवळपास १०० लोकांच्या बँक खात्यातून एटीएमच्या साहाय्याने ५० लाख रुपये काढून घेतले होते. शैलेंद्र सिंग घिसाराम (रा. सुलतानपुरी, दिल्ली) असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
 
वैजापूर येथील विस्तार अधिकारी सुधाकर रंगनाथ म्हस्के (रा. औरंगाबाद) हे सप्टेंबर रोजी वैजापूर रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. या वेळी शैलेंद्र सिंग याने मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड घेत पंच केले. परंतु वापस करताना हातचालाखीने दुसरेच एटीएम दिले. म्हस्के यांचे पैसे काढून झाल्याने ते तत्काळ निघून गेले. परंतु दोन दिवसांनी ते पुन्हा एटीएममध्ये गेले असता ते एटीएम कार्ड त्यांचे नसल्याचे त्यांना दिसले.

त्यानंतर त्यांनी बँक खाते तपासले असता त्यांच्या बँक खात्यातून ७७ हजार रुपये काढल्याचे त्यांना कळाले आणि हा प्रकार त्या दिवशी मदत करणाऱ्याने केला असावा, असा दाट संशय त्यांना आला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. डॉ. आरती सिंह यांनी प्रकरण गंभीरतेने घेण्याचे आदेश देत स्थानिक गुन्हे शाखा सायबर सेलला सूचना केल्या. तांत्रिक तपासाच्या आधारे पथकाने आरोपींचा शोध लावत दोन महिन्यानंतर आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे सिंह यांनी सांगितले. अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक सय्यद मोसिन, हवालदार रतन वारे, पोलिस नाईक किरण गोरे, रवींद्र लोखंडे, सागर पाटील, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, गजानन बनसाेड यांनी कारवाई पार पाडली.
 
नातेवाइकांना घेतले गँगमध्ये : शैलेंद्र सिंग हा पूर्वी ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये चालक होता. त्यामुळे त्याला दूरच्या प्रवासाची सवय होती. या कामासाठी त्याने त्याच्या नात्यातलेच विनोदसिंग गजेसिंग (२५, रा. हरियाणा), पालाराम गजेसिंग (३२, रा. हरियाणा) आणि राजेश सतबिरसिंग (२५, रा. दिल्ली) यांना घेऊन फिरायचा. पोलिसांनी यांनादेखील छत्तीसगड, गोंदिया आणि बालाघाट येथून अटक केली. त्यांचे अाणखी दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

अलिशान राहणीमान
शैलेंद्र सिंगला पोलिसांनी रायपूरच्या थ्री स्टार हॉटेलमधून अटक केली. शैलेंद सिंग सातवीपर्यंत शिकलेला आहे. परंतु अशाप्रकारे पैसे कमवून तो अलिशान राहायला लागलेला होता. स्विफ्ट कारमध्ये फिरणे, महागडे मोबाइल, कपडे, घड्याळी आणि थ्री स्टार, फाइव्ह स्टारमध्ये वास्तव्य करत होता.
 
एटीएम शोधण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास : एका एटीएममध्ये लुटल्यानंतर शैलेंद सिंग त्याचे साथीदार तत्काळ शहर सोडून जायचे. अशाप्रकारे त्याने २०१५ ते २०१७ मध्ये सात राज्यांमध्ये प्रवेश करत १०० लोकांचे एटीएम चोरून ५० लाख रुपये चोरले. यात महाराष्ट्रातील वैजापूरसह, औरंगाबाद, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये त्यांनी हा प्रकार केला.
 
शैलेंद सिंग एमटीएममध्ये जायचा, एकजण मागे राहायचा : वय व्यक्तीची राहणीमान पाहून शैलेंद सिंग एटीएममध्ये जाणारी व्यक्ती हेरायचा. त्याआधी एटीएम काही सेकंद हँग होण्यासाठी तांत्रिक गडबड करायचा. त्यानंतर कार्डधारक आत जाताच त्याच्या मागून जात त्याचे कार्ड मदत करण्याच्या बहाण्याने घेऊन परत देताना मात्र दुसरेच एटीएम कार्ड द्यायचा. त्यानंतर काही वेळाने कार्डमधून पैसे काढून घेत होता. बऱ्याचदा मूळ पासवर्ड देखील बदलायचा. अशा प्रकारचे त्याच्याकडे नामांकित बँकांचे ६५ बनावट एटीएम कार्ड होते. यात बहुतांश बनावट तर काही बंद पडलेले होते. दिल्ली येथील गफ्फार मार्केटमधून ताे हे बनावट कार्ड घेत असे. दोन वर्षांपूर्वी छत्तीसगड पोलिसांनी त्याला याच प्रकरणात अटक केली होती. परंतु जामिनावर सुटताच त्याने परत हा प्रकार सुरू केला.
बातम्या आणखी आहेत...