आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Husbands Are Doing Work Rather Than On Women Councillors Post

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरूषांचे राजकारण: नगरसेविका घरीच, कार्यक्रमांत पतिराजांचाच वावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्याने प्रत्येक सभागृहात आता ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला दिसू लागल्या असल्या तरी या महिलांच्या हाती खऱ्या अर्थाने अजून सत्ता आली नाही. मनपात ५७ महिला आहेत; परंतु निवडणुकीनंतर झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमांकडे नजर टाकली तर अशा कार्यक्रमात महिला नगरसेविका घरी, तर त्यांचे पतिराजच त्यांचे प्रतिनिधित्व करत असल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नाही, तर महिला नगरसेविकांच्या आयोजित सत्कार सोहळ्यातही पतिराजांनीच तो स्वीकारल्याचेही दिसून आले.
पालिकेची निवडणूक झाल्यानंतर वॉर्डा-वॉर्डांत नगरसेवकांचे सत्कार सोहळे आयोजित करण्यात आले होते. अशा समारंभांना महिला नगरसेविकांबरोबर त्यांच्या पतींनीही हजेरी लावली. काही ठिकाणी केवळ महिला नगरसेविकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. तेव्हा महिला नगरसेविका घरी, तर त्यांचे पतीच सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर हजर असल्याचे दिसून आले. जूनला स्व. गोपीनाथ मुंडे यांचा प्रथम स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने भाजपच्या वतीने जालना रस्त्यावरील शासकीय दूध डेअरीच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या ११ पैकी फक्त चारच नगरसेविका स्वत: तेथे आल्या. अन्य नगरसेविकांच्या पतींनीच तेथे हजेरी लावली.
महिला आरक्षणाचे फायदे सर्वांनाच वाटत असले तरी प्रत्यक्षात महिलांच्या नावावर पुरुषच राजकारण करत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यापूर्वी लता दलाल, विजया रहाटकर, साधना सुरडकर, डॉ. आशा बिनवडे अशा बोटावर मोजल्या जातील इतक्या महिलांनी स्वकर्तृत्वावर राजकारण केले. अलीकडे आरक्षणामुळे महिलांना राजकारणात येणे अनिवार्य झाले; परंतु केवळ आरक्षण म्हणून पत्नी, भावजयी, बहिणीला पुढे केले जाते.
प्रत्यक्षात पुरुष मंडळीच राजकारण करत आहेत. गेल्या आठवड्यात शहरातील दोन वृत्तपत्रांचे वर्धापन दिन साजरे झाले. तेथेही पत्नी घरी अन् पतीच प्रतिनिधी म्हणून समोर आल्याचे दिसून आले, तर बहुतांश जोडपे सोबतीने आले होते. थेट नगरसेविका अशा कार्यक्रमाला एकटी आल्याचे दिसले नाही.
पतींनीच स्वीकारला पत्नीच्या वतीने सत्कार
एका समाजातील महिला नगरसेविकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यासाठीही त्यांच्या पतींनी पत्नीला घराबाहेर काढले नाही. पत्नीच्या वतीने पतिराजांनीच सत्कार स्वीकारला अन् विशेष म्हणजे संयोजकांनाही काहीच वाटले नाही. त्यांनी खुश्शाल त्यांच्या पतींचा सत्कार केला.
प्रश्न फक्त पाच वर्षांचा
- आरक्षणामुळे पत्नीला निवडणूक रिंगणात उतरावे लागले. प्रश्न फक्त पाच वर्षांचा आहे. आरक्षण बदलल्यानंतर पुन्हा मलाच लढावे लागेल. केवळ पाच वर्षांसाठी आयुष्याचा प्रश्न बाहेर का काढावा? बायकोला सोबत घेऊन कोठे फिरू? बायकांना जास्त राजकारण कळलेले चांगले नाही. टीका होईल, पण मी करतो तेच योग्य आहे, असे मला वाटते.
एक नगरसेविका पती.
तर घरचे वेळापत्रक बिघडेल
- यापूर्वीच्या महिला नगरसेविका कोठे सक्रिय होत्या? त्यांचे पतीच सर्व कारभार सांभाळत. बायकोला बाहेर काढले तर घरचे सर्व वेळापत्रक बिघडते. राजकारण आम्ही करतोय, त्यामुळे सर्व गोष्टी आम्हालाच बघाव्या लागतात. आम्हीच बघणार. बायकोला घराबाहेर का काढावे? सकाळी 4 वाजता पाणी आले नाही म्हणून ती टाकीवर जाणार का?
एक नगरसेविका पती.