आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hyderabad Muktisangram Celebrate At Dr.bamu Aurangabad

पुढील वर्षी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाचा पहिला खंड प्रकाशित होईल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतस्वतंत्र झाल्यानंतर हैदराबाद मुक्तिसंग्राम का झाला? हा संग्राम म्हणजे केवळ हिंदू-मुस्लिम यांच्यातील वाद आहे, असा अनेक जण अर्थ काढतात. नव्या पिढीसमोर या लढ्याची खरी परिस्थिती समोर यावी गैरसमज दूर व्हावे, यासाठी या लढ्याचा इतिहास लिहिणे आवश्यक आहे, अशी विनंती माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे स्वातंत्र्यसैनिकांनी केली. यासाठी मराठवाड्यातील विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईल आणि पुढच्या मुक्तिसंग्रामदिनी इतिहासाचा पहिला खंड प्रकाशित केला जाईल, असे आश्वासन कुलगुरु डॉ. बी. ए.चोपडे यांनी दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी कुलगुरू डॉ. चोपडे बोलत होते. कार्यक्रमापूर्वी कुलगुरूंच्या हस्ते इतिहास वस्तुसंग्रहालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक अ‍ॅड. भगवानराव देशपांडे, लक्ष्मीनारायण जैस्वाल, सुधाकर देशमुख आजेगावकर, चंदाताई जरिवाला यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाघमारे म्हणाले, निझामाच्या राज्यात येणाऱ्या या प्रदेशात तीन संस्कृती नांदत होत्या. मराठवाडा, कर्नाटक तेलंगण. या प्रदेशात भाषाही वेगळ्या होत्या. स्वातंत्र्यसैनिकांच्या अथक परिश्रमानंतर पोलिस अ‍ॅक्शन झाली हा भाग स्वतंत्र झाला. हा इतिहास आजच्या पिढीला कळणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने इतिहास लिखाण करण्यास सुरुवात केली होती. मी कुलगुुरू असताना दोन पुस्तकेही प्रकाशित केली. नंतर मात्र हे काम थांबले. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थनेदेखील या बाबत विपुल साहित्य उपलब्ध करून ठेवले आहे. हे सगळे एकत्र करून या लढ्याचा तटस्थपणे इतिहास लिहिला जावा, असे मत वाघमारे यांनी व्यक्त केले. या लढ्याबाबत अभ्यास करता अनेक मंडळी बेजवाबदारपणे वक्तव्य करतात. तेलंगण व्हाइसच्या कॅप्टन रेड्डी यांनी देखील असे विधान केले, याचा गांभीर्याने विचार व्हावा, असे मत अ‍ॅड. भगवानराव देशपांडे यांनी व्यक्त केले. या वेळी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी कुलगुरु डॉ. बी. चोपडे, कुलसचिव धनराज माने, बीसीयूडीचे संचालक डॉ. के. व्ही काळे, सुरेश गायकवाड, चेतना सोनकांबळे, विद्यार्थी संसद सचिव नामदेव कचरे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले.

कुलगुरू डॉ.बी.ए. चोपडे यांचे आश्वासन, विद्यापीठात स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार
निझाम राजवटीच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशाला हैदराबाद प्रदेश म्हणत. या प्रदेशात त्या काळात तेलंगणातील १८ जिल्हे, मराठवाड्यातील जिल्हे हैदराबाद- कर्नाटकातील जिल्हे येत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा सगळा प्रदेश वेगळा झाला. आता तेलंगण स्वतंत्र राज्य झाले. मराठवाडा वेगळा प्रदेश आहे. मराठवाड्यातील जनता मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करते, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.

छायाचित्रात स्वातंत्र्यसैनिक अ‍ॅड. भगवानराव देशपांडे यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे. सोबत माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, के. व्ही. काळे, आणि कुलसचिव धनराज माने.