आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Will Canvass The Community For Working: Anna Hazare

समाजासाठी झटणार्‍या उमेदवाराचा प्रचार मी करणार : अण्णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आगामी निवडणुकीत राजकीय पक्षांना पाठिंब्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. राजकीय पक्ष भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, अशी सडकून टीकाही त्यांनी केली. समाजासाठी झिजतोय असा उमेदवार जर औरंगाबादमधून लढणार असेल तर त्याचा प्रचार करा. असा उमेदवार सुचला तर मला सांगा. मीही प्रचाराला येईल, अशी ग्वाही त्यांनी आज दिली.
जनहित प्रतिष्ठानतर्फे लोकपाल कायद्याच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन गुरुवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाले. या वेळी आयोजित जाहीर सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. सतीश तळेकर, निवृत्त जिल्हा न्यायाधीश प्रभूअप्पा चावरे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अब्दुल कादरी, अँड. साई महाशब्दे, अँड. लक्ष्मण प्रधान, तन्मय पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
अण्णा म्हणाले, घटनेत पक्षांना स्थान नाही. पहिलीच निवडणूक पक्षाच्या माध्यमातून लढवली गेली. ती घटनाबाह्य होती. मतदारांना जागृत करण्यासाठी मार्चपासून मी देशभर दौरा करणार आहे. येत्या निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर निष्कलंक उमेदवाराला मते दिल्यास चांगले कायदे निर्माण होऊ शकतील. तरुणांकडून देशाला मोठय़ा अपेक्षा आहेत. देशाच्या भवितव्यासाठी तरुणांनी सबंध घटनांकडे डोळसपणे बघून सक्रिय राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. या सभेला पाच हजारांवर गर्दी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तरुणाईचा उत्साह मात्र दांडगा होता.
अँड. तळेकर अपक्ष लढणार
लोकसभा निवडणूक अपक्ष लढणार असून प्रचाराला अण्णा हजारे येणार असल्याचे अँड. सतीश तळेकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. दोन दिवसांपूर्वी राजकारणात येण्याचा मानस नसल्याचे अँड. तळेकर यांनी सांगितले होते.
‘राइट टू रिकॉल’साठी फक्त ममता बॅनर्जी राजी
‘राइट टू रिजेक्ट, राइट टू रिकॉल यासारखे 17 मुद्दे असलेले पत्र आपण देशातील सर्व पक्षप्रमुखांना दिले होते. हे मुद्दे मान्य आहेत काय, अशी विचारणा केली, तेव्हा फक्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीच तयारी दर्शवली, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.