आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षेतील यश म्हणजे संयमाचा विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्पर्धा परीक्षेच्या निकालात अपेक्षेप्रमाणे यश मिळणे आणि अपयश आले तर पुन्हा जोमाने तयारी करून यशोशिखर गाठणे हा काळ सत्त्वपरीक्षेचा असतो. खऱ्या अर्थाने या परीक्षेत मिळालेले यश म्हणजे संयमाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यशस्वी झालेल्या अनिकेत पाटणकर, संदीप भगवानराव घुगे (१०५ वा क्रमांक),आशिष अविनाश काटे (६९१ वा क्रमांक) यांनी दिली.
यूपीएससीचा अंतिम निकाल शनिवारी जाहीर झाला. याची परीक्षा गेल्यावर्षी २४ आॅगस्टला ५९ केंद्रांवर झाली होती. या परीक्षेत औरंगाबादचा अनिकेत चंद्रहास पाटणकरचा ९२ वा रँक आला असून इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिअरिंग आणि नंतर एमबीए झालेला अनिकेत सध्या एशियन पेंट्स कंपनीत मुंबई येथे मॅनेजर आहे. तर, परभणीचा संदीप भागवत घुगेचा १०५ वा रँक आला आहे. संदीप मेकॅनिकल इंजिनिअर असून परभणी येथे इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्राध्यापक आहे. तर आशिष अविनाश काटेला ६९१ वा रँक मिळाला आहे. त्याचे एमबीबीएस झाले आहे.
स्वयंअध्ययनावर भर
आशिष काटे म्हणाला, मेहनत,जिद्द आणि कष्ट यामुळे यश हमखास मिळते. यावर माझा विश्वास आहे. स्वयंअध्ययन सर्वात महत्त्वाचे ठरते. दुसऱ्या प्रयत्नात मला हे यश मिळाले. नियोजनाचा मला जास्त उपयोग झाला. शालेय शिक्षण सातवीपर्यंत मुकुल मंदिर शाळेत झाले असून दहावी सरस्वती भुवन येथून झाले. देवगिरी महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेतून केल्यानंतर ठाणे येथील राजीव गांधी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएससी पदवी घेतली. आशिषचे वडील अविनाशदेखील इंजिनिअर असून आई शुभांगी गृहिणी आहे.
क्लासेसविना यश
अनिकेत पाटणकर म्हणाला, नियमित वर्तमानपत्रांचे वाचन आणि लेखनाचा सरावदेखील अभ्यास करताना आवश्यक आहे. पर्यायी विषय म्हणून मी इतिहासची निवड केली. कोणतेही क्लासेस केले नाही. नियोजन आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या मित्रांचे सहकार्य मला मिळाले. याचबरोबरच नेटसर्फींगचा ही उपयोग झाला. संयम ठेवणे आणि मेहनत यावर विश्वास होता. दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. प्राथमिक शिक्षण धर्माबाद ( जि. नांदेड) येथील हुतात्मा पानसरे स्कूलमध्ये झाले. तर आर्यचाणक्य विद्यालय उस्मानाबाद येथे नंतरचे शालेय शिक्षण घेतले. दयानंद सायन्स कॉलेज लातूर येथून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर आयआयटी मुंबईमधून एमबीए केले. सध्या एशियन पेंटस कंपनीत मॅनेजर म्हणून मुंबई येथे काम करत आहे.
बालपणाचे स्वप्न अखेर पूर्ण झाले
संदीपघुगे म्हणाला,या परीक्षेतील अत्यंत कठीण गोष्ट म्हणजे संयम ठेवणे मी मानतो. तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आहे. तुम्हाला पहिल्या परीक्षेत यश मिळाले आणि दुसऱ्या टप्प्यात अपयशी झाला तर पुन्हा सुरुवातीपासून तयारी करावी लागते. त्यामुळे हा संयमाचा विजय मी मानतो. सामान्य अध्ययनाची तयारी व्हावी म्हणून मी समाजशास्त्र हा विषय पर्यायी निवडला. बालपणापासून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न होते.अधिकाधिक ज्ञान घेता यावे यासाठी मी इंजिनिअरिंग केले. माझे शालेय शिक्षण बालविद्या मंदिर परभणी येथे झाले. त्यानंतर महात्मा फुले विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुणे विद्यापीठातून पूर्ण केल्यानंतर परभणी येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयातच प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. सुरुवातीचे काही काळ क्लासेस केले. परंतु नंतर स्वअध्ययन महत्त्वाचे ठरल्याचे संदीप म्हणाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, सनदी अधिकारीपद हे तर काटेरी मुकुट...