आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयडिया’चा क्रमांक वापरून लॉटरीचे आमिष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आयडिया मोबाइल कंपनीच्या कॉल सेंटरचा ‘+121’ हा क्रमांक इंटरनेटद्वारे वापरून नागरिकांकडून पैसे उकळण्याची शक्कल भामट्यांनी लढवली आहे. ‘आयडिया’चे 200 रुपयांचे व्हाऊचर रिचार्ज करा आणि आयडिया, केबीसीकडून 25 लाखांचे बक्षीस मिळवा, असे आमिष दाखवून बँकेत पैसे भरण्यास लोकांना भाग पाडले जात आहे. औरंगपुर्‍यातील एका मोबाइलधारकाला अशा प्रकारे गंडवण्याचा प्रयत्न फसला.

संदीप सरोसिया यांनी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मोबाइलवर शनिवारी सकाळी 10.15 वाजता ‘+121’ या क्रमांकावरून कॉल आला. लकी ड्रॉमध्ये सामील होण्यासाठी 200 रुपयांचे रिचार्ज करण्याचे आवाहन समोरील व्यक्तीने केले. कंपनीतून फोन आल्याचे समजून सरोसिया यांनी तत्काळ रिचार्ज केले. रिचार्ज झाल्याबरोबर पाकिस्तानातून त्यांना एका क्रमांकावरून फोन आला व तुमच्या क्रमांकाची निवड करण्यात आली असून आयडिया, केबीसीकडून 25 लाखांचे बक्षीस जाहीर झाल्याचे त्या व्यक्तीने म्हटले. 25 लाखांचा चेक खात्यावर जमा होईल असे सांगत फोनवरील भामट्याने रिझर्व्ह बँकेचे राजवीरसिंग नावाच्या व्यक्तीला संपर्क साधण्याचे म्हटले.

राजवीरसिंगने सरोसियांकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेत पैसे खात्यावर ट्रान्सफर करू असे आश्वासन दिले. परंतु त्याआधी आयसीआयसीआय बँकेच्या कुठल्याही शाखेतून कल्याण राय नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर 19,100 रुपये भरा, असे सांगितले. शिवाय लकी ड्रॉसंबंधी मित्रांना माहिती देऊ नका व बँकेत पैसे जमा केल्यावर मोबाइल बंद करून ठेवा, असे सांगितल्यामुळे सरोसिया यांना संशय आला आणि त्यांनी बँकेत पैसे जमा केले नाही.