आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहीर आटली, बाग करपली; पण त्यांनी जिद्द नाही सोडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिथं निसर्गाची साथ नाही, तिथं जगणं शक्य होणार नाही आणि जिथं जगणं हे जगणं उरत नाही, तिथं उरतो फक्त संघर्ष. जीवन-मरणाचा... तिथं नशिबाला दोष देऊन काय फायदा? फुलंब्रीतील विजय रामराव नागरे यांनी याच सूत्राचा अंगीकार केला आणि प्रतिकूल परिस्थितीवर कल्पकतेने मात केली. खडकाळ जमिनीवर आज त्यांची डाळिंबाची बाग तग धरून उभी आहे.

1972 सालच्या दुष्काळाच्या झळा संपूर्ण राज्याने सोसल्या. त्या आठवणी अजूनही पुसट झालेल्या नाहीत. त्यानंतर बरोबर 40 वर्षांनी, म्हणजे आज त्यापेक्षाही भीषण परिस्थिती मराठवाडा अनुभवतोय. अशा परिस्थितीत नजर टाकेल तिकडं दिसतात दुष्काळाच्या असह्य झळ्या. पाण्याअभावी करपून जाणा-या फळबागा, डोक्यावर जिवापेक्षा मोठा हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण फिरणारी पोरं अन् मुठभर हिरव्या चा-यासाठी जिभल्या चाटणारी गुरं. परंतु, अशाही परिस्थितीत काहीठिकाणी पाहायला मिळते परिस्थितीवर मात करण्याची इच्छाशक्ती आणि विलक्षण जिद्द. फुलंब्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पानेवाडी रोडवर विजय नागरे या प्रगतीशील शेतक-याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हतबल न होता केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर डाळींबाची बाग उत्तमरित्या जोपासली आहे. आठ दिवसांतून विहिरीत साठणा-या अवघ्या चार ते पाच ड्रम पाण्याचे सुयोग्य नियोजन करून त्यांनी डाळींबाच्या झाडांना जीवदान दिले आहे.

साखर कारखान्यात 15 वर्षे नोकरी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा व्यवस्थित चालत नव्हता. नोकरीवर विसंबून राहून आपण कुटुंब चालवू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली व सरळ आधुनिक शेतीची कास धरली. शेतीत पूर्वापार घेण्यात येत असलेल्या ऊस, कापूस, मका, बाजरी अशा पिकांना फाटा देवून त्यांनी फळशेती करण्याचा संकल्प केला. तथापि, मुख्य अडचण पाण्याची होती. परंतु त्यांनी पारंपारिक पद्धतीने पिकाला दांडाने पाणी देण्याची पद्धत बंद करून ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. जवळपास एक लाख रुपये खर्चून त्यांनी संपूर्ण शेतात ठिबक बसवून घेतले. नंतर भगवा जातीच्या डाळींबाची जून महिन्यात लागवड केली. परंतु, यंदा पावसाने दगा दिला व दरवर्षीच्या तुलनेत यंदा विहीरीला केवळ पिण्यापुरतेच पाणी शिल्लक राहिले. होते नव्हते तेवढे पैसे खर्चून खरेदी केलेले ठिबक आणि जेमतेम जमीनीच्या वर डोके काढलेली डाळींबाची रोपं हे समीकरण त्यांच्या डोळ्यांत पाणी आणून गेलं. परंतु त्यांनी आहे त्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करून अक्षरश: थेंब थेंब पाणी झाडाच्या मुळापर्यंत कसे पोहचेल याकडे लक्ष दिले. ठिबकद्वारे देण्यापुरतेही पाणी राहिले नसल्याने आहे त्या पाण्याचा संचय करून दर तीन दिवसाआड ते पत्नी मंदाकीनीच्या मदतीने हाताने झाडांना पाणी घालतात. तीनशे रोपांना प्रत्येकी एक लिटर असे दर तीन दिवसाआड एक हजार लिटर पाणी पुरेसे होते. त्याचबरोबर बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्यांनी झाडांच्या खोडाभोवती पालापाचोळा अंथरून पुष्कळ मातीचा भराव घातला. झाडांच्या फांद्यांची छाटणी करून पानांद्वारे होणारे बाष्पीभवनसुद्धा त्यांनी रोखले आहे.


दुष्काळी परिस्थितीत अगोदरच हाती असलेला पैसा खर्च करून टाकल्यामुळे ग्रामीण भागात सध्या शेतीत अतिरिक्त पैसा खर्च करण्याची लोकांची मानसिकता उरली नसली तरी विजय नागरे यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळाने परिस्थितीवर मात केली आहे.