आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्शगाव हिवरेबाजार होणार ‘कॅशलेस’, विभागीय व्यवस्थापक भंडारी यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केंद्र सरकारच्या धोरणानुसार नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार ‘कॅशलेस’ होणार आहे. गावातील सर्व व्यवहार आता महाराष्ट्र बँकेच्या शाखेतर्फे होतील. गावात रोखीने व्यवहार कमीत कमी अपवादानेच होतील. त्या दष्टीने आवश्यक ती व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे विभागीय व्यवस्थापक दीपक भंडारी यांनी दिली. ग्रामविकासाबाबत कायम आघाडीवर राहणाऱ्या हिवरे बाजारने याबाबतही राज्यात आघाडी घेतली आहे. 

 

भंडारी यांनी नुकताच झोनल व्यवस्थापक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “जास्तीत जास्त व्यवहार रोखीशिवाय बँकेतर्फे करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्याला अनुसरून हिवरे बाजार गावाने पावले टाकली आहेत. या महिना अखेरपर्यंत सर्व व्यवहार कॅशलेस होतील, अशी व्यवस्था करण्याचे काम बँकेतर्फे सुरू आहे.” 

 

महाराष्ट्र बँकेने नोटाबंदी नंतर उद्भवलेल्या परिस्थितीतही उत्तम काम केल्याची माहिती देऊन भंडारी म्हणाले, “मुद्रा योजनेअंतर्गत बँकेने १८ कोटी ६९ लाखांचे कर्ज वाटप केले. करंट सेव्हिंगचे (कासा) उद्दिष्ट बँकेने मार्चच्या आधीच पूर्ण केले.” यावेळी बँकेचे विभागीय उपव्यवस्थापक सुनील दत्त, वसुली व्यवस्थापक विवेक चौसाळकर, आय. जी. पाटील, बँक मित्र विनायक पवळे उपस्थित होते. 

 

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार 
बँकेनेशेतकऱ्याना कर्जमुक्त करण्यासाठी योजना सुरू केली आहे. तिची मुदत २८ फेब्रुवारी होती. ती आता ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही योजना बँकेने स्वत:च सुरू केली. बँकेने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुद्दलातही काही प्रमाणात सुट देऊ केली आहे. आतापर्यंत ५० कोटींच्या कर्जापैकी ११ कोटी वसूल झाल्याची माहिती चौसाळकर यांनी दिली. मध्यंतरी नोटाबंदीमुळे यात अडचणी निर्माण झाल्या, पण आता पुन्हा प्रतिसाद वाढला आहे. 

बातम्या आणखी आहेत...